पुणे / प्रतिनिधी :
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. या आघाडीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोणता, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कोणता, याला महत्त्व नाही. माझ्यासाठी सगळेच महत्त्वाचे पक्ष आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाला छेद दिला. दरम्यान, सिल्वर ओक येथील बैठकीत महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत कोणतीच चर्चा झाली नाही. आगामी निवडणुका एकत्रपणे लढवायच्या यावर एकमत झाले असल्याचे आणि तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य जागा वाटपांबाबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू राम तांकवले यांच्या श्रद्धांजली सभेला शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच मोठा भाऊ, असे वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये कलगितुरा रंगला आहे. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करताना म्हटले, की महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. या आघाडीत पहिल्या क्रमांकावरील पक्ष कोण दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कोणता, याला महत्त्व नाही. माझ्यासाठी सगळेच महत्त्वाचे पक्ष आहेत. महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतीच चर्चा झाली नाही. आगामी निवडणुका एकत्रपणे लढवायच्या यावर एकमत झाले आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य जागा वाटपांबाबत चर्चा करणार आहेत. त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास, उद्धव ठाकरे, मी आणि मल्लिकार्जुन खर्गे अथवा सोनिया गांधी हे निर्णय घेतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नेत्यांची आतापर्यंत तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कसा सुरू आहे, हे राज्यातील जनतेने पाहिले असल्याचे पवार म्हणाले. अनिल देशमुखांना नाहक तुरुंगवास घडला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात कितीतरी तक्रारी दाखल आहेत, एखादा बॉक्स भरेल. मात्र, चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण आणि चांगले काम करणाऱ्यांना त्रास असा प्रकार सध्या सुरू असून वाटेल ती किंमत देऊ. परंतु आम्ही आमचा रस्ता सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. नवाब मलिक यांची भूमिका सत्यावर आधारित होती. त्याची यंत्रणांनी नोंद घ्यावी, असेही पवार यांनी म्हटले. राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असून हा गैरवापर कसा होतोय हे दिसून येत आहे असेही ते म्हणाले.
दोन हजारच्या नोटबंदीच्या निर्णयाबाबत बोलताना ते म्हणाले, लहरी माणसाने निर्णय घ्यावेत असे निर्णय घेतले जातात. नोटबंदी त्यातलाच एक भाग आहे. नोटबंदीच्या मागील निर्णयानंतर पुणे जिल्हा बँकेची मोठी रक्कम बदलून मिळाली नाही बँकेचे नुकसान झाले. सुरुवातीला नोटबंदी नंतर चमत्कार होईल असे सांगितले गेले परंतु, लोकांनी आत्महत्या केल्या हा चमत्कार घडला. आताही तोच चमत्कार घडू शकतो.
राज्यात वातावरण बिघडण्यात आमचा संबंध असल्याचा आरोप होतोय, तो विनोद आहे. सत्तेत असणाऱ्यांना काय रोल आहे हे तपासावे लागेल असे त्यांनी नमूद केले. तुम्ही राहुल गांधींविषयी असेच बोलत रहा, लोक त्यांना शक्ती देत राहतील हे कर्नाटकमधून दिसले आहे, असा टोला विरोधकांना लगावत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. स्थिर सरकार देण्यासाठी सगळ्यांना एकत्र आणणे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे एखाद्या मीटिंगला आले नाहीत, असे म्हटले तर मी त्यांच्यावर आरोप केले असे होत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलण्यासारखे नाही. त्यामुळे ते असे बोलत असतील, असे ते म्हणाले.
तुम्ही काहीही विचारा पण माझ्या वयाचा हा शब्द मागे घ्या
शरद पवार यांना एका पत्रकाराने या वयात तुम्ही इतके काम करताय, असा प्रश्न विचारला तेव्हा शरद पवारही नाराज झाले आणि तुम्ही काहीही विचारा पण या वयात हा शब्द मागे घ्या, असे मिश्किलपणे ते म्हणाले.








