गोव्याच्या रस्त्यांवर 2023 मध्ये 120 दिवसांत 104 आणि 2022 मध्ये 218 लोकांचा मृत्यू झाला. दररोज अपघातांची संख्या वाढत असताना, रस्ता अपघात ही एक भयानक महामारी बनली आहे. गोव्याच्या प्रत्येक कोपऱ्यात मृत्यूची नोंद होत आहे. हे जितके भयंकर वाटते तितके गोव्याचा कोणताही भाग रस्ते मृत्यू आणि अपघातांच्या विळख्याने अस्पर्शित राहिलेला नाही, हे देखील स्पष्ट होते. गेल्या आठवड्याच्या शेवटी आणि कामगार दिनापर्यंत सहा मृत्यूची नोंद झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 ते एप्रिल 2023 पर्यंत, आतापर्यंत नोंदविलेल्या 951 अपघातांमध्ये 104 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2022 मध्ये मृतांची संख्या 218 होती. 2023 मध्ये अवघ्या चार महिन्यांत मृत्यूने शतकाचा टप्पा ओलांडला आहे. ही प्रचंड प्रमाणात महामारी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
गोव्यातील रस्त्यांवर दररोज रक्त सांडते आहे आणि कुटुंबे दररोज अंत्यसंस्कार आणि शोक करीत आहेत. सोमवारी बेतोडा-बोरी येथे कार दोनदा उलटल्याने झालेल्या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कळंगुट येथे झालेल्या दुसऱ्या एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी दक्षिण गोव्यात तीन मृत्यूची नोंद झाली. मंगळवारी देखील अपघाताची नोंद झाली. धुळापी-जुने गोवे येथे बाणस्तारी पुलाजवळ दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या टक्करीत एकटा जागीच ठार झाला.
यावषी पहिल्या चार महिन्यांत वास्को, वेर्णा, दाबोळी, गुळे-काणकोण, मेरशी, झुआरीनगर, बाळ्ळी, गवंडाळी, करंझाळे, वरूणापुरी, म्हापसा, सांगे, सिरसई, आगशी, सांखळी, बोडगेश्वर-म्हापसा, कुंडई, अटल सेतू, नानोडा, नागोवा-हडफडे अशा अनेक ठिकाणी जीवघेणे अपघात झाले आहेत.
वास्को, वऊणापुरी, काणकोण, हडफडे-नागोवा आणि पणजी येथे चार महिन्यांत दोनपेक्षा जास्त अपघातांची नोंद झाली आहे. गोव्याच्या रस्त्यांवर मरण पावलेले बहुतेक लोक 18 ते 26 वयोगटातील तऊण आहे. तरुणांचा अशाप्रकारे बळी जात असल्याने त्यांच्या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसतो. या धक्क्यातून सावरण्यासाठी कुटुंबांना बराच कालावधी लागतो. दररोज होत असलेल्या रस्ता अपघातांची जाणीव सर्वांनाच आहे परंतु वाहन चालविताना काळजी घेतली जात नाही. त्यामुळेच अपघात होतात. तरुण पिढी तर भन्नाट वेगाने वाहने चालविण्यात स्वत:ला धन्य मानतात मात्र एकदा वाहनावरील नियंत्रण गेले की, अपघात हा ठरलेलाच असतो.
गोवा कॅन, गोवा रोड सेफ्टी फोरम आणि मार्ग यासारख्या संस्था या रस्त्यांवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी काम करीत आहेत परंतु रस्ता अपघात घटण्याचे नाव घेत नाही.
गोवा रोड सेफ्टी फोरमचे दिलीप नाईक म्हणतात, ‘अनेक रायडर्स/ड्रायव्हर्सना वाटते की, त्यांना सर्व नियम माहीत आहेत. तथापि, अनेकांना रस्त्यावर सुरक्षितपणे वाहन चालविण्याचे नियम माहीत नाहीत. रस्त्यांवरील रक्तस्नान बंद करण्याच्या आमच्या सूचना आम्ही सर्व अधिकाऱ्यांपर्यंत वारंवार पोहोचविल्या आहेत. आता या प्रकरणाची चौकशी करणे आम्ही त्यांच्यावर सोपविले आहे. रस्ते अपघात रोखण्यात सरकार कमी पडत आहे. केवळ मोटार वाहन कायदा लागू करण्यावर लक्ष केंद्रित करून फायदा होणार नाही.’ ते म्हणाले.
सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे गोवेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अपघात प्रवण क्षेत्रे दुऊस्त न केल्यास आणि अपघात होत राहिल्यास 2024च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची धमकी कुंडई येथील ग्रामस्थांनी दिली आहे. मानसवाडा-कुंडई येथे वारंवार अपघात होतात. यावर उपाययोजना आखावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी दरवेळी केली परंतु या मागणीकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेच नाही. त्यामुळेच आज ग्रामस्थांना रस्त्यावर यावे लागले. तसेच लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा देणे भाग
पडले.
लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्यानंतर तरी सरकार याकडे गांभीर्याने पाहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारने जर उपाययोजना आखण्यासाठी पुढाकार घेतला नाही तर संपूर्ण गोव्यात निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भाषा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारला मग हीच भाषा समजते, असा त्याचा अर्थ होईल. कारण ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते आणि जेव्हा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला जातो, तेव्हाच सरकार जागे होते, असे स्पष्ट होईल.
हल्लीच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे गावात अपघातांचे प्रमाण वाढल्याने सावर्डे येथील ग्रामसभा वादळी ठरली. त्यांच्या निष्क्रियतेबद्दल सदस्यांनी पंचांना फैलावर घेतले. वाहतूक पोलीस अधीक्षक बॉस्युएट सिल्वा रस्ता अपघातांवर म्हणाले, ‘राज्यभरात झालेल्या अपघातांमध्ये रायडर्ससोबतच मोठ्या संख्येने दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. आम्ही प्रथम जनजागृती करण्याचा आणि लवकरच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.’
गोव्यात दररोज रस्ते अपघातात सरासरी जवळपास एका मृत्यूची नोंद होत आहे. ही भयानक परिस्थिती कधी थांबणार, हे सांगणे कठीण असले तरी प्रत्येकाने जबाबदारीने वाहन चालविले तर काही प्रमाणात रस्ता अपघात टाळणे शक्य आहे. वाहतूक पोलीस रस्त्यावर व अडगळीच्या ठिकाणी उभे राहून ‘तालांव’ देण्याचे काम करतात परंतु रस्ता अपघात नियंत्रणात येत नाही.
वाहतूक पोलिसांना दररोज ठराविक महसूल गोळा करण्यासाठी टार्गेट दिले जाते. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठीच पोलीस धडपडत असल्याचे दिसून येते. विशेष करून परराज्यातून येणाऱ्या वाहनांना तालांव देण्याचे काम व्यवस्थितरित्या केले जाते. वाहतूक पोलीस सरकारी तिजोरीत भर घालत असले तरी रस्ता अपघात टाळण्यात ते अपयशी ठरू लागले आहेत.
महेश कोनेकर








