दुपारनंतर कार्यालय पडले ओस
बेळगाव / प्रतिनिधी
दिवाळीत सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका कार्यालयाला सुटी होती. रविवारच्या सुटीला दिवाळीची सुटी जोडून आल्याने मंगळवारी अनेक अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी रजा घेतली होती. सुटी न घेतलेले अधिकारी व कर्मचारी फिरकले नसल्याने कार्यालय ओस पडले होते. त्यामुळे मंगळवारी सुटी नसूनही कार्यालयाला सुटी असल्याचा अनुभव आला.
सलग सुटय़ांमुळे अनेक अधिकारी व कर्मचारी मंगळवारी सुटीवर होते. दिवाळीनिमित्त सोमवार आणि बुधवार असे दोन दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. रविवार आठवडा सुटीला जोडूनच दिवाळीची सुटी असल्याने मंगळवारी रजा घेऊन अनेक अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी चार दिवस दिवाळीच्या सुटीचा आनंद घेतला. मंगळवारी कार्यालय सुरू असल्याने काही नागरिक कामानिमित्त कार्यालयात आले होते. मात्र, प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी सुटीवर असल्याने कोणीच भेटू शकले नाहीत. काही संगणक ऑपरेटर व मोजकेच कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. सकाळच्या सत्रात हजेरी लावून दुपारनंतर सर्वच कर्मचाऱयांनी कार्यालयाला दांडी मारली. त्यामुळे दुपारनंतर महापालिका मुख्य कार्यालय ओस पडले होते. सलग सुटय़ा आल्याने तसेच मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने काही जण कार्यालयाकडे फिरकले नाहीत. मात्र, महत्त्वाच्या कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले.









