अधिकारी सी. व्ही. रामन ः एप्रिल 2023 पासून होणार कार्यवाही
वृत्तसंस्था/ मनेसर
पुढील वषी म्हणजे एप्रिल 2023 पर्यंत मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या सर्व मोटारी इ-20 इंधनावर धावणार असल्याचे प्रतिपादन मुख्य तांत्रिक अधिकारी सी. व्ही. रामन यांनी नुकतेच केले आहे.
सध्याला भारतामध्ये पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत पर्यायी इंधनाचा शोध घेण्यासाठी अनेक कंपन्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात इलेक्ट्रिक मोटारी आपला वाटा उचलत आहेतच. पेट्रोलवरचे अवलंबीत्व कमी करण्याच्या उद्देशाने मारुती सुझुकीनेही आपले पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीवरची वाहन निर्माती कंपनी म्हणून मारुती सुझुकीचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. तर दुसरीकडे 2025 पर्यंत आपली पहिलीवहिली इलेक्ट्रिक मोटर बाजारात लॉन्च करणार असल्याचे कंपनीने सुतोवाच केले आहे. पुढील वर्षापर्यंत सर्व मोटारी इ-20 इंधनावर धावतील अशी योजना करण्यात आली आहे.
ते म्हणाले, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कंपन्यांना इ-20 इंधनावरील वाहनांची निर्मिती करण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्याला अनुसरून मारुतीकडून एप्रिल 2023 पर्यंत सर्व वाहने तयार केली जातील.
इ-20 इंधनचा अर्थ
इ-20 इंधन अर्थात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20 टक्के इतके असणे होय. सध्याला पेट्रोलमध्ये भारतामध्ये 10 टक्केपर्यंत इथेनॉल मिसळले जात आहे. पुढील वषी एप्रिलपर्यंत हे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढवले जाणार असल्याचेही केंद्राने म्हटले आहे. असे करण्याने कार्बन उत्सर्जनामध्ये घट होण्यास मदत होणार असल्याचेही सांगितले जात आहे. परदेशातून आयात इंधनाच्या प्रमाणामध्येही बऱयापैकी घट होणार आहे.









