रत्नागिरी :
विविध मराठा मंडळे आणि मराठा संस्था यांच्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी येथे मराठा समाजाचे महासंमेलन शहरात आयोजित केले आहे.
या फेडरेशनमध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या ५५ विविध संस्था सभासद झालेल्या असून रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील संस्थांचाही यात समावेश आहे. कार्यक्रमाचे सहआयोजक मराठा मंडळ, रत्नागिरी आणि क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी आहेत.
मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हितवर्धन करणे आणि त्याचबरोबर आपले क्षात्रतेज व संस्कृती जपत समाजातील तरुणाईला उच्च विद्यार्जनाकडे तसेच व्यवसाय, उद्योगाकडे वळवून आर्थिकदृष्ट्या आपली भावी पिढी सक्षम बनविणे यासाठी फेडरेशन सातत्याने प्रयत्न करीत असते. यासाठी मराठा समाजानेही एकजुटीने व मनापासून याप्रयत्नाना साथ देण्याची गरज आहे. हा विचार मराठा समाजात रुजविण्यासाठी आणि मराठा समाजात ऐक्य घडवून आणण्यासाठी फेडरेशनने प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांची महासंमेलने भरवण्यात येणार आहेत. या वेळी त्याचा मान रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला आहे.








