गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर टीका
सांगली :
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात सध्या सुरू असलेल्या वादाला आता वैयक्तिक टीकेची धाट आली आहे. या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांना संयम पाळण्याचे आणि मर्यादा राखण्याचे आवाहन केले आहे.
आमदार कदम यांनी सोशल मीडियावर स्व. राजारामबापू पाटील यांच्या छायाचित्रासह एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की,
“सांगली जिल्हा हा महाराष्ट्रातील सुसंस्कृत आणि विधायक राजकारणासाठी ओळखला जातो. या जिल्ह्याने स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील, स्व. राजारामबापू पाटील, स्व. शिवाजीराव देशमुख, स्व. पतंगराव कदम, स्व. आर. आर. आबा पाटील, स्व. शिवाजीराव शेंडगे बापू, आण्णासाहेब डांगे यांसारखे महाराष्ट्राला दिशा देणारे महान नेते दिले आहेत.”
त्यांनी पुढे म्हटले की, “या सर्व नेत्यांनी कधीही वैयक्तिक टीका न करता सुसंस्कृत आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सकारात्मक राजकारण केले. अगदी स्वातंत्र्यसैनिक असलेल्या राजारामबापूंनीही राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे काल जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्व. राजारामबापू आणि जयंतराव पाटील यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत दुःखदायक आणि निंदनीय आहे.”
“जिल्ह्यातील राजकारण नेहमी सभ्य आणि वैचारिक पातळीवर राहिले आहे. वैयक्तिक आणि कौटुंबिक टीका-टिप्पणी टाळली गेली आहे. हीच परंपरा पुढे जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण ते सुसंस्कृत भाषेत मांडले पाहिजेत. हीच आपली ओळख आहे.” – असे आवाहन करत कदम यांनी सर्वच राजकीय नेत्यांनी संयम आणि मर्यादा पाळाव्यात, असे स्पष्टपणे सांगितले.








