पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, अफवांना झुगारुन देण्याचे आवाहन
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या शिक्षण धोरणात सर्व भाषांना समान महत्व देण्यात आले असून कोणत्याही भाषेला पक्षपाती किंवा सापत्न वागणूक देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते नव्या शिक्षण धोरणाच्या तिसऱ्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘अखिल भारतीय शिक्षा संगम’ या कार्यक्रमात भाषण करीत होते. केंद्र सरकारच्या भाषाधोरणाविषयी हेतुपुरस्सर दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. हा कार्यक्रम येथील ‘भारत मंडपम्’ या सभागृहा आयोजित केला गेला होता. आज अनेकजण स्वत:च्या राजकीय लाभासाठी भाषिक धोरणात राजकारण घसडू पहात आहेत. विद्यार्थ्याची सक्षमता तो कोणत्या भाषेचा आहे यावरुन निर्धारित करणे हा त्या विद्यार्थ्यावर घोर अन्याय आहे. त्याची सक्षमता ओळखण्यासाठी त्याचे गुण पहावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
त्यांनी दुकाने बंद करावीत
जे पक्ष किंवा ज्या राजकीय शक्ती भाषेच्या नावाने समाज फोडण्याची कामे करीत आहेत त्यांना आता त्यांची दुकाने बंद करावी लागणार आहेत. मातृभाषेतून शिक्षण या संकल्पनेमुळे बहुसंख्य भारतीय विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले हे एक आश्वासक पाऊल आहे. अनेक देश त्यांच्या स्थानिक भाषांना प्राधान्य देण्यामुळेच पुढे आले आहेत. भारतही आता त्याच दिशेने प्रयत्न करीत आहे. युरोपात बहुतेक देश त्यांच्या राष्ट्रीय भाषांमध्येच व्यवहार करतात. भारतात तर अशा प्रादेशिक भाषांचे भांडार आहे. पण येथे अशा भाषांमध्ये शिक्षण घेणे किंवा व्यवहार करणे कमीपणाचे मानले जाते. ही मानसिकता मोडण्याचा प्रयत्न नव्या शिक्षण धोरणातून करण्या आला आहे. त्यामुळे यापुढे समाजशास्त्रापासून इंजिनिअरींगपर्यंत सर्व विषय स्थानिक भाषांमध्ये शिकविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
शक्यतांचे जन्मस्थान
आज भारताकडे जगातील अनेक देश विविध शक्यतांचे जन्मस्थान म्हणून पहात आहेत. त्यांना भारत संधींच्या रुपाने खुणावत आहे. भारताच्या आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांच्या शाखा आपल्या देशांमध्ये निघाव्यात म्हणून अनेक देश प्रयत्न करीत आहेत. नव्या शिक्षण धोरणात या सर्व नव्या प्रवाहांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवे शिक्षण धोरण भारताचे भवितव्य घडविणार असून त्याला सर्वांनी मनापासून पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
संशोधन आणि विकासाचे केंद्र
नव्या शिक्षण धोरणात भारताला जगाचे संशोधन आणि इनोव्हेशनचे केंद्र बनविण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचसमवेत भारताच्या पारंपारिक ज्ञानठेव्याशींही विद्यार्थ्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे. परंपरा विसरुन केलेला आधुनिकतेचा स्वीकार योग्य मार्ग दाखवत नाही. त्यामुळे भारताच्या पारंपारिक ज्ञानाचेही महत्व आम्हीं जाणले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी श्री योजनेअंतर्गत स्थापन केल्या जाणाऱ्या शाळांसाठीचा पहिला आर्थिक साहाय्य हप्ता घोषित केला आहे. या शाळांमधून विद्यार्थ्यांना नवभारताच्या निर्माणासाठी आवश्यक गुण विकसीत करणारे शिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी याच कार्यक्रमात शिक्षण आणि कौशल्यविकास पुस्तकेही प्रकाशित केली. ही पुस्तके 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहेत. कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम अत्यंत सोप्या भाषेत शिकविण्याचा या पुस्तकांचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नवे शिक्षण धोरण सर्वसमावेशक
ड नव्या शिक्षण धोरणात आधुनिक शिक्षणासमवेत पारंपरिक ज्ञानाचाही समावेश
ड नव्या शिक्षण धोरणात प्रमुख भर मातृभाषेतील शिक्षणावर, तंत्रज्ञानावरही भर
ड श्री योजनेअंतर्गत आधुनिक शाळा स्थापनेसाठी निधीचा प्रथम हप्ता वितरीत
ड कौशल्य विकास पुस्तकांची 12 भारतीय भाषांमधील भाषांतरे केली वितरीत