संग्राम काटकर,कोल्हापूर
Kolhapur Football News : शाहू छत्रपती गोल्डकप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेसाठी कोलकाता,केरळ,गोवा,बेंगळूरू मधील बलाढ्य चार संघ निमंत्रित केले होते.चार संघांचा स्थानिक चार संघाविरूद्ध आमना-सामना होईल,असे स्पर्धेचे स्वरूप होते. मुळात राष्ट्रीय पातळीवरील कोलकाता,केरळ,गोवा, बेंगळूरू येथील संघांची देशातील फुटबॉलमध्ये असलेली मक्तेदारी सर्वमान्य आहे.त्यामुळे या संघांविरूद्ध खेळताना स्थानिक चार संघांचा कितपत टिकाव लागेल,अशी उलट-सुलट चर्चाही रंगली होती. अनेकांनी तर स्थानिक संघांचा दारूण पराभव होईल,अशी मतेही मांडली होती.मात्र मैदानात स्थानिक संघांनीच स्पर्धेतील राष्ट्रीय संघांना कडवी झुंज देताना आपल्यावरील अॅटॅकला काऊंटर अॅटॅकने उत्तर देत गोल नोंदवून पराभवाची धुळ चारली. शिवाय आम्ही आता देशातील बलाढ्य संघांना तुल्यबळ टक्कर देऊ शकतो हेही दाखवून देत कोल्हापुरी फुटबॉल फिव्हर खऱ्या अर्थाने देशपातळीवर पोहोचवला.
गेल्या दोन दशकांपासून छत्रपती शाहू स्टेडियममध्ये होणाऱ्या त्याच त्याच स्पर्धा व विविध संघातून आलटून-पालटून खेळणारे तेच तेच खेळाडू,संघ समर्थकात नेहमीप्रमाणे उफाळून येणारी खून्नस,वादावादी आणि या वादावादीतून सतत बिघडणारी कायदा व सुवस्था या सगळ्या प्रकाराला फुटबॉल शौकिन वैतागून गेला होता.पण याबाबत पुढे येऊन कोणी बोलत नव्हते.मात्र स्थानिक संघात काय धमक आहे,हे जर पहायचे असेल तर या संघाविरुद्ध बाहेरील संघांचे सामने झाले पाहिजे.मग स्थानिक संघांना कळेल की आपण कुठे आहोत,आणि देशात फुटबॉल काय पद्धतीने खेळला जातो अशी टीका सतत होत होती.दुसरीकडे बाहेरील संघांच्या राहण्या-जेवणापासून अन्य सुविधा देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मोठ्या खर्चामुळे स्थानिक स्पर्धा आयोजक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यास धजत नव्हते.त्यामुळे दरवर्षीच्या फुटबॉल हंगामात स्थानिक संघातच स्पर्धांचे धुमशान असेच चित्र पहायला मिळत होते.शिवाय कोल्हापुरातील खेळाडूंनी फक्त शाहू स्टेडियममध्ये खेळायच.त्यांच्यात बाहेर जाऊन खेळायची धमक नाही,असे खेळाडूंच्या क्षमतेवरच बोट ठेवणारा आरोपही होत होता.या आरोपाशी अनेक फुटबॉल शौकिन सहमतही होते.मात्र या सगळ्या आरोप-प्रत्यारोपाला खोडून काढण्यासाठी संधी नुकत्याच झालेल्या शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेने स्थानिक संघांना मिळवून दिली. इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य व केएसए अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी ही संधी मिळवून दिली असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.
तंत्रशुद्ध खेळाने जिंकली मने…
आपल्या मिळालेल्या संधीचं सोनं करताना शिवाजी तऊण मंडळ,पाटाकडील तालीम मंडळ,बालगोपाल तालीम मंडळ व संयुक्त जुना बुधवार पेठ या संघांनी मोहामेडन स्पोर्टिंग क्लब (कोलकाता),केरळा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड (केरळ)ऊटस् फुटबॉल क्लब (बेंगळूऊ) धेम्पो स्पोर्टस् (गोवा) या संघांना कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर कडवी झुंज देऊन हम भी किसीसे कम नाही,हे दाखवून दिले.तुम्ही फक्त कोल्हापुरात आपल्या-आपल्यातच खेळून बाद व्हायचा होत राहणार आरोपही खोडून काढला.इतकेच नव्हे स्थानिक स्पर्धेत एकमेकांना खुन्नस,देऊन वादावादी करणाऱ्यांनाही आपल्या खेळावर टाळ्या वाजवण्यास भाग पाडले,ही स्थानिक संघांची जमेची बाजू म्हणावी लागले. कारण मोहामेडन स्पोर्टिंग क्लब,केरळा स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड,ऊटस् फुटबॉल क्लब व धेम्पो स्पोर्टस् हे प्रोफेशनल,कसलेल्या आणि मातब्बर संघ चेंडूशी वन-टू टचमध्ये खेळणारे होते. पासिंगच्या जोरावर कोठून कशी चाल करायची यातही हे संघ माहिर होते.तेव्हा अशा संघाविरूद्ध आमना-सामना करण्यासाठी तंत्रशुद्ध खेळल्याशिवाय स्थानिक संघासमोर पर्यायच नव्हता.स्थानिक संघांच्या प्रशिक्षक व व्यवस्थापकांनी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचा प्रशिक्षणा संदर्भातील सी लायसन्स हा कोर्स पूर्ण केला आहे. या कोर्सच्या माध्यमातून त्यांनी आपला संघ सामन्याचा पुर्वार्ध व उत्तरार्ध कोणत्या स्टॅटर्जीने खेळला पाहिजे याचा अभ्यास कऊन त्यापद्धतीने मैदानात संघाला खेळवले.
फिफा वर्ल्ड कपमधील फॉर्म्युला आणला उपयोगी…
नुकत्याच झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये जे संघ खेळले ते कोणत्या फॉर्म्युल्यानुसार खेळले याचाही अभ्यास कऊन आपल्या संघांनी मोहामेडन,केरळा इलेक्ट्रिसिटी, धेम्पो व ऊटस् एफसी या विरूद्ध लढण्याची मानसिकता देखील करवून घेतली. त्यामुळेच शिवाजी तरूण मंडळ व संयुक्त जुना बुधवार पेठ हे दोन्ही मात्तबर केरळा इलेक्ट्रिसिटी संघाविरूद्ध नेटाने आणि जीगरबाज खेळ करू शकले. शिवाजी मंडळाने तर केरळा इलेक्ट्रिसिटीचा अंतिम सामन्यात पराभव करत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या अजिंक्यपदावर कब्जा करत संघाचे आपले नाव देशाच्या पटलावर कोरले.जेमतेम संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने तर केरळा इलेक्ट्रिसिटी संघाला सामन्यात विजयी होण्यासाठी मोठा संघर्ष करायला लावला.केरळा इलेक्ट्रिसिटीकडून पाटाकडील तालीम मंडळ भलेही पराभूत झाले असले तरीही या संघाने केरळा इलेक्टिसिटी संघावर गोलसाठी केलेल्या प्रयत्नांचे खूप कौतुक केले.बालगोपाल तालीम मंडळाने तर धेम्पो स्पोर्टस् संपूर्ण सामन्यात गोल करण्याची संधीच दिली नाही. या सगळ्यातून कोल्हापुरातील संघांमध्ये बाहेरील संघांशी लढण्याची धमक तर आहेच, शिवाय त्यांना जिंकण्याची उर्मी देखील आहे, हे स्पष्ट झाले आहे.
सातत्याने अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा व्हाव्यात…
कोल्हापुरातील संघांच्या खेळावर खुष होऊन अ.भा.फुटबॉल फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल डॉ.शाजी प्रभाकरन यांची छत्रपती शाहू स्टेडियमला हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्याबाबतचा शब्द दिला आहे.तेव्हा आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममध्ये खेळण्यासाठीची पूर्व तयारी म्हणून स्पर्धा आयोजकांनी अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा आयोजन करण्याची तयारी ठेवावी लागेल.वर्षातून दोन-तीन तरी अशा स्पर्धा झाल्याच पाहिजे.स्थानिक संघ जसे देशातील संघासोबत खेळू लागतील,तशी संघांमध्ये मोठी इफ्रुव्हमेंट होत जाईल.कोल्हापूरी फुटबॉलमध्ये इफ्रुव्हमेंटचीच आता खरी गरज आहे.
विशाल भोगम (संघ व्यवस्थापक : शिवाजी तऊण मंडळ)
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









