बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तरचे उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांना केवळ मराठी भाषिकच नाही तर उर्दू व कानडी भाषिकांचाही भरघोस पाठिंबा मिळत आहे. महांतेशनगर परिसरात अनेक कन्नड भाषिक मतदारांनी आपण अॅड. अमर येळ्ळूरकरांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे इतर भाषिकांचाही महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा असल्याचे यातून दिसत आहे. म. ए. समितीने आजवर कोणत्याही भाषेचा अनादर केलेला नाही. त्यामुळेच इतर भाषिकही म. ए. समितीच्या कार्यामध्ये आहेत. इतर भाषिकांपेक्षाही म. ए. समितीच्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला प्रेम दिले. त्यामुळेच आपण म. ए. समितीचा उमेदवार विजयी करणार, असा विश्वास महांतेशनगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला. महिलांनी आरती ओवाळून अॅड. येळ्ळूरकरांचे स्वागत केले. उर्दू भाषिक मतदारांनीही आम्हाला बेळगावात शांतता हवी असून आपण समितीच्या मागे उभे राहणार असल्याचे सांगितले.
वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव
अॅड. अमर येळ्ळूरकर यांचा रविवारी वाढदिवस होता. हा आनंद त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत साजरा केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी मला भरभरून मते देऊन विजयी करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केले. रामलिंगखिंड गल्ली येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना अॅड. सुधीर चव्हाण म्हणाले, अॅड. अमर येळ्ळूरकरांमुळे बेळगाव उत्तरमध्ये समितीला गतवैभव प्राप्त झाले आहे. इतर राष्ट्रीय पक्षांपेक्षा म. ए. समितीचे पारडे जड असल्यामुळेच केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र व कर्नाटकाचे मंत्री या ठिकाणी प्रचाराला आणावे लागत आहेत. हीच समितीची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर मतदारसंघात आज भव्य बाईक रॅली
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तरचे उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ सोमवार दि. 8 रोजी भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता कपिलेश्वर मंदिरापासून बाईक रॅलीला सुरुवात होणार असून त्यानंतर शहराच्या मुख्य भागात ही रॅली काढली जाणार आहे. यामध्ये स्वाभिमानी मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन येळ्ळूरकर यांनी केले आहे.









