बसप करणार नाही कुठल्याच पक्षासोबत आघाडी
वृत्तसंस्था / लखनौ
बहुजन समाज पक्ष भविष्यात होणाऱया सर्व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बसप कुठल्याच पक्षासोबत आघाडी करणार नसल्याची घोषणा पक्ष प्रमुख मायावती यांनी स्वतःच्या जन्मदिनी लखनौमध्ये प्रसारमाध्यमांना संबोधित करताना रविवारी केली आहे.
चालू वर्षात कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि अन्यत्र होणारी निवडणूक बसप स्वबळावर लढविणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही कुठल्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही. समाजवादी पक्षाने संसदेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षण संमत होऊ दिले नव्हते. संसदेत विधेयकाची प्रतही सप खासदारांनी फाडली होती. बसपने मात्र राज्यात सत्तेवर असताना अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना त्यांचा अधिकार मिळवून दिला होता. बसपने संत-धर्मगुरुंचा आदर-सन्मान केला, परंतु अन्य पक्षांच्या शासनकाळात असे घडले नसल्याचा दावा मायावती यांनी केला आहे.
बसपला सत्तेवर आणले तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचा लाभ उपेक्षितांना मिळू शकतो. बसपला पाठिंबा देणे हीच माझ्यासाठी जन्मदिनाची सर्वात मोठी भेट ठरणार आहे, याहून अधिक मला काहीच नको असे आवाहन मायावतींनी जनतेला केले आहे.
काँग्रेसवर आरोप
काँग्रेस पक्ष केंद्रात दीर्घकाळात सत्तेवर राहिला, परंतु त्या पक्षाने मंडल आयोगाचा अहवाल लागू होऊ दिला नव्हता. आता भाजप देखील हेच करम आहे. आरक्षणाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. यामुळे स्थानिक स्वराज संस्था निवडणुकींवर प्रभाव पडला आहे. समाजवादी पक्षानेही आरक्षणासंबंधी लोकांची फसवणूक केली असल्याचा आरोप मायावतींनी केला.
सत्तेची चावी घ्यावी लागणार
समाजात बंधुभाव निर्माण करत आम्हाला सत्तेची चावी हातात घ्यावी लागणार आहे. जातीयवादी लोकांमुळे अनेकांना त्यांचा अधिकार मिळेनासा झाला आहे. आरक्षणप्रकरणी काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्ष कधीच प्रामाणिक राहिले नसल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.
भाजपच्या शासनात स्थिती खराब
भाजपच्या शासनकाळात स्थिती अधिकच खराब झाली आहे. केवळ अपयश झाकण्यासाठी दररोज नवनव्या घोषणा केल्या जात आहेत. गुंतवणुकीचे दावे केले जात आहेत, भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे आता उत्तराखंड देखील प्रभावित होत आहे. हल्दानीप्रमाणे विस्थापित केले जात आहे. उत्तरप्रदेशात कायदा-सुव्यवस्थेच्या आडून गलिच्छ राजकारण केले जात आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा दावा त्यांनी केला.









