अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, अरे उद्धवा, तू माझे एव्हढे वर्णन करतोयस खरे पण मी तर नंदाचा गुराखी आहे, उग्रसेनाचा सेवक आहे मग माझी एव्हढी थोरवी आली कुठून? त्यावर उद्धव म्हणाला देवा, तुमची एव्हढी थोरवी नसून तुम्ही सामान्य गुराखी आहात असे म्हणत असाल तर मग काळाचा बिमोड करून गुरुपुत्र परत कसा आणलात? गोवर्धन पर्वत केवळ करंगळीवर तोलून धरत इंद्राला झालेल्या गर्वाचे हरण कसे केलेत? प्रत्यक्ष विधात्याला म्हणजे ब्रह्मदेवाला वेड लावलेत आणि स्वत: गाई वासरे झालात. बाणासुराचा कैवार घेणाऱ्या महादेवाना तुम्ही क्षणभरातच जिंकलेत. तुम्ही तर भक्तांचे कैवारी आहात. त्यासाठी लीला करून तुम्ही निरनिराळे अवतार घेता आणि दीनांचा उद्धार करता. ऋषीकेशी तुमचा महिमा असा अगाध आहे. आम्हाला ह्याच अवतारात त्याची निश्चित प्रचीती आली.
भक्तांच्यावर मात्र तुम्ही कायम करुणा करता. तुम्हाला नमस्कार करायचं भाग्य देवानाही दुर्लभ असतं पण रामावतारात तुम्ही वानरांना दर्शन दिलेत. तुम्ही कृपा करून बोलावे म्हणून वेद तिष्ठत उभे असतात पण वानरांच्या कानात मात्र तुम्ही तुमचे मनोगत अगदी मनापासून सांगितलेत. तुमचे ज्ञान वेदशास्त्रानाही कळत नाही इतके अगाध आहे परंतु असं असलं तरी तुम्ही मात्र वानरांचा सल्ला घेत होतात आणि त्याप्रमाणे वागत होतात. ह्याला काय म्हणावे? यज्ञात अर्पण केलेले तुम्ही काही घेत नाही पण वानरांनी अर्पण केलेली वनातली फळे मात्र त्यांच्यावर कृपा करून तुम्ही खाल्लीत. असे भक्तांच्यावरचे प्रेम मेघश्यामा तुम्ही वारंवार प्रकट करत असताना त्यात कोणताही भेदभाव करत नाही. तुम्ही खरोखर जगाचे आत्माराम आहात. तुम्ही मनापासून सगळ्यांशी मैत्री करता आणि लोकांच्या हृदयात वास करताना त्यांच्याबाबतीत कोणताही फरक करत नाही. खरं म्हणजे सगळ्यांचा आवाका काही सारखा नसतो पण त्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही. कोणताही प्राणिदेह हा निर्जीव असतो. तुम्ही त्यात चैतन्य निर्माण करता. मूर्खाना ज्ञान देता, सर्व जीवाना तोषवता. अशाप्रकारे सर्व जगावर तुमची सत्ता नांदत असते. मातापित्याचे त्यांच्या मुलाबाळांवर अत्यंत प्रेम असते. तुम्ही मात्र प्रत्येकाच्या हृदयात वास करून सर्वांना सुख देता. प्रत्येकाच्या हृदयात काय चालले आहे हे तुम्हाला लगेच समजते. त्यामुळे तुम्ही कृपावंत दीनांचे स्वामी म्हणून सर्वांना अत्यंत वंदनीय आहात.
अशा भक्तांसाठी दीनदयाळू असलेल्या तुम्हाला सोडून कोण इतरांना भजायला जाईल? ब्रह्मा, विष्णू, महेश हे मायेतून निर्माण झालेले अवतार आहेत आणि तुम्ही तर मायेचे नियंते ईश्वर आहात. तुम्ही भक्त करुणाकर असून सुखदाते आहात. तुमची भक्ती केल्यावर चारही पुरुषार्थ, चारही मुक्ती भक्तांना लोटांगण घालतात.
एव्हढी प्राप्ती भक्तांना केवळ तुमची भक्ती केल्यामुळे होते. तुम्ही सर्वज्ञ असल्याने तुमच्या भक्तांच्या मनात काय आहे हे सहजी जाणता आणि त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांना देऊन टाकता. असे तुम्ही उत्तमोत्तम स्वामी आहात. तुमच्यामुळे साधकांना परमसुख मिळते. तुमच्यासारखा पुरुषोत्तम कुणीच नाही. तुम्ही सर्वांचे स्वामी असलात तरी तुमच्या भक्तांच्यासाठी पूर्णपणे कृपाळू असता. भक्त प्रल्हादावर विषप्रयोग झाले, त्याला अग्नीत देखील टाकले गेले परंतु नाना प्रकारच्या बाधेतून तुम्ही त्याचे रक्षण केलेत. भक्तांवर असलेल्या प्रबळ कृपेने तुम्ही उत्तानपाद राजाच्या ताह्या मुलावर बाळ ध्रुवावर कृपा करून त्याला अढळपद दिलेत. बिभीषण रावणाचा भाऊ, म्हणजे खरं तर शत्रूचा भाऊ पण तो तुम्हाला अनन्यशरण आल्यावर तुम्ही त्याच्यावर कृपा तर केलीच पण त्याच्या पुण्याईमुळे शत्रू असूनही रावणाचाही उद्धार झाला. तशीच कृपा बळीवरही केलीत आणि त्याच्या इच्छेनुसार द्वारपालही झालात. तेव्हा तुमच्यासारख्या स्वामींना सोडून कोण जाईल?
क्रमश:








