चंद्राबाबूंची प्रशंसा करत समर्थकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
तेलगू देसम पक्षाने तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत राज्यातील अन्य राजकीय पक्ष हे तेदेप प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांची प्रशंसा करून या पक्षाच्या समर्थकांना स्वत:च्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करत आहेत, चंद्राबाबू नायडू हे अलिकडेच अंतरिम जामिनावर तुरुंगातून बाहेर पडले आहेत.
कौशल्य विकास महामंडळाशी निगडित घोटाळ्याप्रकरणी 53 दिवस तुरुंगात राहिल्यावर 31 ऑक्टोबर रोजी राजामहेंद्रवरम मध्यवर्ती तुरुंगातून चंद्राबाबू बाहेर पडले आहेत. कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यामुळे आंध्रप्रदेशचे 300 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे.
तेदेपने तेलंगणाच्या 2018 मधील विधानसभा निवडणुकीत 3.5 टक्क्यांपेक्षा अधिक मते प्राप्त करत दोन जागा जिंकल्या होत्या. परंतु यावेळी तेदेपने अज्ञात कारणांमुळे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बीआरएसचे मंत्री पी. अजय कुमार हे आंध्रप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या खम्मम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी चंद्राबाबू नायडू यांना झालेली अटक अवैध असल्याचे म्हणत जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारची निंदा केली होती. राजकारणात अटकेची कारवाई योग्य नसल्याचे कुमार यांनी म्हटले होते.
काँग्रेस उमेदवारही शर्यतीत
खम्मम येथील काँग्रेस उमेदवार तुम्मला नागेश्वर राव यांनीही चंद्राबाबू नायडू यांच्या सुटकेचे स्वागत केले आहे. याच्या पुढे जात राव यांनी 31 ऑक्टोबर रोजी तेदेप कार्यालयात जात नायडू यांच्या सुटकेचा आनंद इतरांसोबत व्यक्त करू इच्छित असल्याचे सांगितले. तेदेप कार्यकर्त्यांच्या आनंदात मी देखील सहभागी आहे. याच उत्साहासोबत मी तेदेप कार्यकर्त्यांनी निवडणुकीपर्यंत माझे समर्थन करण्याची विनंती करतो असे राव यांनी म्हटले.
कसानी ज्ञानेश्वर यांचा राजीनामा
खम्मम जिल्ह्यातील सथुपल्ली येथील बीआरएसच्या उमेदवाराने देखील नायडूंच्या मुक्ततेवर आनंद व्यक्त केला आहे. नायडू हे तुरुंगातून मुक्त होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी तेदेप तेलंगणा अध्यक्ष कसानी ज्ञानेश्वर यांनी राज्यात निवडणूक न लढविण्याच्या पक्षाच्या निर्णयानंतर तेदेपमधील पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. ज्ञानेश्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने तेलंगणातील तेदेप आता नेतृत्वविहिन झाला आहे. तर तेदेपकडून तेलंगणाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा देण्यात यावा यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
सुटकेनंतर आनंद व्यक्त
तेदेप प्रमुख नायडू हे तुरुंगातून बाहेर पडल्यावर आनंद व्यक्त करत अजय कुमार यांनी माझे वडिल चंद्राबाबूंचे अत्यंत निकटवर्तीय असून ते नेहमी त्यांच्याविषयी विचारणा करायचे असे म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी नायडू यांच्या समर्थनार्थ खम्मम येथे आयोजित रॅलींचे देखील समर्थन केले आहे.









