खेड / राजू चव्हाण :
यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. २३ जूनपासून आरक्षण खुले होणार आहे. गणेशोत्सवातील कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण काही मिनिटांतच हाऊसफुल्ल होवून प्रवाशांचा हिरमोड होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्या जाहीर केलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. आता चाकरमान्यांचा नजरा गणपती स्पेशल गाड्यांकडे खिळल्या आहेत.
तुतारी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस, मत्त्यगंधा एक्सप्रेस, मुंबई-मंगळूर या गाड्यांची गणेशोत्सवातील आसन क्षमता आरक्षण खुले होताच काही मिनिटांतच संपते. यामुळे गाड्यांच्या शेकडो प्रवाशांना प्रतीक्षा यादीवरच रहावे लागते. रेल्वे प्रशासनाने ६० दिवस आधी आरक्षणाची तारीख जाहीर केली असली तरी गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केलेली नाही.
कोकण मार्गावर गणेशोत्सव कालावधीत विशेष गाड्या चालवण्याच्या मागण्या कोकण विकास समितीसह जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेनेही काही दिवसांपूर्वीच रेल्वेबोर्डाला पत्राद्वारे सूचवत्त्या आहेत
मुंबई-चिपळूण दरम्यान स्वतंत्र विशेष गाडी चालवण्याच्या मागणीनेही जोर धरला आहे. रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेवून गणेशभक्तांना दिलासा द्यावा, असा आग्रही धरण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर दिवा-चिपळूण व दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही होत आहे.
रेल्वे प्रशासन आरक्षणानंतरच एकामागोमाग एक गणपती स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करत गणेशभक्तांना सुखद धक्का देत असते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गणरायाचे २७ऑगस्ट रोजी आगमन होणार असल्याने चाकरमान्यांना आतापासूनच नियोजनाचे वेध लागले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन यंदाही गणपती स्पेशलचा नक्कीच सुखद धक्का देईल, अशी आशाही गणेशभक्तांना आहे.
- संपूर्ण अनारक्षित विशेष गाड्या चालवणे आवश्यक
सामान्यपणे गणपती विशेष गाड्या सोडताना शेवटच्या क्षणी वातानुकूलित गाड्या सोडल्या जातात. तसे न करता यावेळी सर्वप्रथम संपूर्ण वातानुकूलित गाड्यांचे नियोजन करून आरक्षण सुरू करावे. तसेच सर्व गणपती विशेष अप व डाऊन गाड्यांचे आरक्षण एकाच दिवशी एकाचवेळी सुरू न करता किमान एक दिवसाच्या फरकाने सुरू केल्यास प्रवाशांना सोयीस्कर ठरेल. खेड, वीर व माणगाव येथून पनवेल, दिवा, वसई, कल्याण किंवा मुंबईपर्यंत संपूर्ण अनारक्षित विशेष गाड्या सोडल्यास सर्वांचीच सोय होईल.
अक्षय महापदी, रेल्वे अभ्यासक, कळवा-ठाणे








