पुणे / प्रतिनिधी :
देशाची मान उंचावणाऱ्या चांद्रयान-3 मोहिमेच्या लँडिंगच्या ऐतिहासिक क्षणांचे विद्यार्थ्यांना साक्षीदार होता यावे, या उद्देशाने या मोहिमेचे थेट प्रक्षेपण विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये दाखवले जावे. तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी एक विशेष संमेलन आयोजित केले जावे, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिल्या आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 उद्या संध्याकाळी 5.45 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. संध्याकाळी 5.30 वाजल्यानंतर चांद्रयान-3 लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे, असे युजीसीने म्हटले आहे.
इस्रोच्या अधिकृत वेबसाइट (https://www.isro.gov.in/) आणि इस्रोच्या अधिकृत यूटय़ूब चॅनलवर आणि डीडी नॅशनल संध्याकाळी 5:27 वाजता चांद्रयान-3 लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. देशभरातील अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये चांद्रयान मोहिमेचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. अनेक शैक्षणिक संस्थांनी त्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असून विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. अंतराळ क्षेत्रातील तज्ञांची व्याख्याने, सादरीकरण अशा माध्यमांतून विद्यार्थ्यांना अंतराळ मोहिमांची माहिती दिली जाणार आहे.








