हरियाणा सरकारकडून अत्यंत मोठी घोषणा : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी रविवारी कुरुक्षेत्र येथे जाहीर सभा घेत आतापर्यंतच्या स्वत:च्या कामकाजाला लोकांसमोर मांडले. यादरम्यान मुख्यमंत्री सैनी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. हरियाणाच्या शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाला सरकार आता एमएसपीवर खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांनी कुठलेही पीक घेतले तरीही त्याला किमान हमीभाव मिळणार असल्याचे सैनी यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत 14 पिके आम्ही एमएसपीवर खरेदी करत राहिलो आहोत, परंतु आतापासून 10 नव्या म्हणजेच एकूण 24 पिकांना हरियाणा सरकार एमएसपीवर खरेदी करणार आहे. या 24 पिकांना केंद्र सरकार देखील एमएसपीवर खरेदी करते.
काँग्रेसवर साधला निशाणा
काँग्रेसचे असत्य आणि एमएसपीवरून दिशाभूल करण्याचे राजकारण आता शेतकरी बंधूंसमोर आहे. देशभरात जेथे कुठे काँग्रेसचे सरकार आहे, तेथे केवळ दोन पिकांना एमएसपीवर खरेदी केले जाते, त्याची रक्कम एफसीआयच्या माध्यमातून केंद्र सरकारच देते. हरियाणाचा शेतकरी काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडणार आहे. राज्यात आता ट्रान्सफॉर्मर बदलण्याचा खर्च राज्याच्या शेतकरीबंधूंकडून वसूल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सैनी यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य
मागील 10 वर्षांमधील आमची कामगिरी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात हरियाणा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताकरता तसेच प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी उचललेली पावले दर्शविते, अशाप्रकरचे अन्य कुठलेच उदाहरण देशभरात आढळून येत नसल्याचा दावा सैनी यांनी केला आहे.
लवकरच निवडणूक
हरियाणात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी चालविली आहे. राज्यात सलग दोनवेळा सत्तेवर राहिलेला भाजप तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु यावेळी भाजपसमोर शेतकऱ्यांच्या नाराजीचे आव्हान आहे.









