वार्ताहर/हिंडलगा
मण्णूर, सुळगा, हिंडलगा, आंबेवाडी भागात मार्कंडेय नदीकाठच्या भागातील शेतकरी वर्गाने हंगाम पाहून भात पिकाबरोबरच इतरही पिके घेण्यासाठी शेतीची मशागत केली व इंद्रायणी, बासमती, सोनम, अमन अशा विविध प्रकारच्या भात बियाण्यांची पेरणी केली. शिवाय बटाटे, भुईमूग, रताळी, मिरची यांचीही लागवड केली होती. सर्वप्रकारची पिके जोमाने उगवली असतानाच या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतजमिनीत पाणीच पाणी झाले. व सर्व उगवलेली रोपे कुजून गेली. याची पुन्हा पेरणी करायची झाल्यास शेतकरी वर्गाला दुप्पट खर्च आहे. याशिवाय पावसाचा जोर गेले तीन दिवस जास्त झाल्याने पुन्हा शेतजमीनीत पाणी वाढत आहे. मार्कंडेय नदीपात्रातील पाणी आजूबाजूच्या शेतवडीत पसरून नुकसान होत आहे. दुबार पेरणी करावयाची झाल्यास पावसाची उघडीप महत्त्वाची आहे. मशागत व खताचा वापर मोठ्याप्रमाणात केल्यामुळे केल्याने शेतकरीवर्गाला आर्थिक फटका बसणार आहे. तरी कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे, अशी मागणी होत आहे.









