‘ई-नाम’शी जोडल्या जाणार : गणेश जोशी यांनी दिली माहिती
मडगाव : कृषी क्षेत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रोत्साहन देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशभरातील सर्व एपीएमसी मंडई 2025 पर्यंत ‘ई-नाम’शी जोडल्या जाणार असल्याची माहिती राज्य कृषी विपणन मंडळांच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष तथा उत्तराखंडचे कृषीमंत्री गणेश जोशी यांनी दिली. बाणावली येथे सुरू असलेल्या ‘ई-नाम’ राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात श्री. जोशी बोलत होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गोवा कृषी विपणन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, कोसांबचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जे. एस. यादव, गोवा कृषी खात्याचे संचालक नेविल आफोन्सो, आदित्य चौताला इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना गणेश जोशी म्हणाले, राष्ट्रीय कृषी बाजार योजनेला 1 जुलै 2016 रोजी प्रारंभ करण्यात आला. देशभरातील 400 घाऊक एपीएमसी मंडई एका समान ई-प्लॅटफॉर्मद्वारे जोडण्यात आल्या. आज 1538 मंडई ई-नाम शी जोडल्या गेल्या आहेत.
ई-नाम योजनेद्वारे प्रत्येक राज्यातील शेतकरी आपला कृषी माल स्थानिक मंडईत आणून ऑनलाईन पद्धतीने विक्री करू शकतो. उत्तराखंडमधील 16 मंडई ई-नाम सोबत जोडल्या गेल्या आहेत. त्यांना प्रयोगशाळा, संगणक तसेच इतर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्तराखंड कृषी क्षेत्रात स्वयंपूर्णतकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण किती ही कृषी उत्पादन घेतले आणि जर त्याचे मार्केटिंग होत नसेल तर काहीच फायदा होणार नाही. त्यासाठी ई-नाम शी जोडणे महत्वाचे असल्याचे गणेश जोशी यांनी सांगितले. विदेशातून काजू आयात केला जात असल्यामुळे गोव्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे प्रकाश वेळीप आपल्या भाषणात म्हणाले. गोव्याच्या ग्रामीण भागात काजू पीकावर आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे. काजूचे पीक हे गोव्यात महत्वाचे असल्याने गोव्यातील काजू उत्पादक शेकऱ्यांच्या समस्या केंद्र सरकार पर्यंत पोचल्या पाहिजेत व शेतकऱ्यावर होणार अन्याय दूर व्हायला पाहिजे असे श्री. वेळीप म्हणाले. काजूला अपेक्षित दर मिळत नसल्याने गोव्यातील शेतकरी काजूचे उत्पादन घेण्याचे बंद करण्याच्या दृष्टीने विचार करू लागला आहे. अशी परिस्थिर्ती निर्माण होण्यापूर्वीच उपाय योजना काढावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.









