जनावरांच्या कानावर टॅग लावणे आवश्यक, आधार कार्डच्या धर्तीवर जनावरांची नोंद
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारच्या पशुसंजीवनी योजनेंतर्गत जनावरांच्या कानांना लावण्यात येणाऱ्या टॅगची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व जनावरांना टॅग आवश्यक बनला आहे. या योजनेमुळे एकूण जनावरांची संख्या, रोगप्रतिबंधक लसी, औषधांचा साठा व इतर सुविधा पशुपालकांना पुरविणे सोयीस्कर होणार आहे. शासनाने गाय, म्हैस, बैल आणि शेळ्या-मेंढ्यांच्या कानाला टॅग लावून घेणे बंधनकारक केले आहे.
संपूर्ण पशुधनाची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. टॅगिंग झाल्यानंतर जनावरांचे वय, उंची, आहार, जात आणि इतर माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित जनावरांची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. याबरोबर दुभती जनावरे किती, जनावर कोणाच्या मालकीचे आहे, त्याची उत्पादन क्षमता किती, कुठल्या भागातील आहे, कोणत्या जातीचे आहे? यासंबंधीची सर्व माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे.
मागील चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. घरोघरी जाऊन जनावरांच्या कानांना 12 अंकी टॅग लावला जात आहे. सुऊवातीच्या काळात केवळ दुभत्या जनावरांना टॅग लावण्यात आला होता. मात्र आता सर्व जनावरांना
टॅग लावला जात आहे. नवीन जन्म घेतलेल्या किंवा इतर ठिकाणांहून विकत आणलेल्या जनावरांना टॅग लावून घ्यावे, असे आवाहन देखील खात्याने केले आहे.
जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, गाढव, घोडा, कुत्रा, मांजर, डुक्कर, ससे आदींचा समावेश आहे. यापैकी गाय, म्हैस, शेळ्या-मेंढ्या, बैल यांना टॅग लावला जात आहे. या टॅगमुळे दुभत्या जनावरांबरोबर भाकड जनावरांची संख्याही उपलब्ध होणार आहे. ही सुविधा मोफत असून जनावरांना टॅगिंग करून घ्यावे, असे खात्याने कळविले आहे.
हरविलेले जनावर शोधण्यास मदत
एखादे जनावर हरविल्यास त्याचा शोध घेण्यासाठी कानात लावलेल्या टॅगची मदत होणार आहे. कानात लावलेल्या टॅगमुळे जनावर शोधणे सोयीस्कर होणार आहे. शिवाय पशुपालकांनी बाजारातून नवीन जनावर विकत आणल्यास त्याची ओळख पटण्यास हा टॅग महत्त्वाचा ठरणार आहे.
जनावरांची संपूर्ण माहिती सॉफ्टवेअरमध्ये
जनावरांची संपूर्ण माहिती ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये भरली जात आहे. त्यामुळे टॅग लावणे महत्त्वाचे आहे. सर्व जनावरांना टॅग आवश्यक आहे. ज्या जनावरांना टॅग नाही; त्या जनावरांच्या कानावर टॅग लावून घ्यावा, ही सुविधा मोफत असून जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून टॅगिंग केले जात आहे.
-डॉ. आनंद पाटील (तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)









