‘महाराष्ट्र राज्य फलक’ प्रकरणाचा तब्बल 9 वर्षांनंतर निकाल
बेळगाव : येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक हटविल्यानंतर सीमाभागातील मराठी भाषिक असलेल्या गावांमध्ये फलकांची उभारणी करण्यात आली. उचगावमध्येही महाराष्ट्र राज्य उचगाव असा फलक उभे करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तो हटविला होता. या प्रकरणी उचागवच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात सुरू होती. तब्बल 9 वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला असून न्यायालयाने या सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. महाराष्ट्र राज्य येळ्ळुर हा फलक हटविल्यानंतर सीमाभागातील मराठी भाषिक असलेल्या गावांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर बहुसंख्य गावामध्ये असे फलक उभे करण्यात आले. उचगाव येथेही 2014 मध्ये फलक उभारण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन तो फलक हटविला. या प्रकरणी म. ए. समितीच्या 8 कार्यकर्त्यांवर काकती पोलीस स्थानकात भा.दं.वि. 143, 147, 153-अ, सहकलम 149 आणि केपीडीपी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता. उचगाव येथील मनोहर लक्ष्मण होनगेकर, अरुण आप्पाजी जाधव, विवेक सुभाष गिरी, आनंद शंकर देसाई, संतोष गुंडू पाटील, गणपत शंकर पाटील, भास्कर कृष्णा कदम, राजेंद्र वसंत देसाई यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. एम. बी. बोंद्रे, अॅड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले.









