वारणानगर / प्रतिनिधी
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच वारणा परिसरात पाऊसाचा जोर वाढला आहे. अतिवृष्टीमुळे वसंत सागर तथा चांदोली धरणातून वारणा नदीच्या पात्रात ६४०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे वारणा नदी काठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वारणा पाटबंधारे कोडोली उप विभागाचे सहा.अभियंता मिलींद किटवाडकर यानी आज रविवार दि.१ रोजी वारणा धरणातून सुरु असलेल्या २९०० क्युसेक विसर्गात वाढ करुन धरणाच्या वक्र द्वारा मधून ५००० क्युसेक व विद्युत जनित्र मधून १४०० क्युसेक विसर्ग, असा एकूण ६४०० क्युसेक विसर्ग सायंकाळी ५.०० वा. सुरु केला आहे.त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वारणा धरण व्यवस्थापनाने याबाबत महसूल विभागाच्या वाळवा,शिराळा, मिरज,शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, क्षेत्राचे प्रांताधिकारी तसेच संबधित तहसिलदार तसेच गांवाना परिपत्रक काढून सूचना देण्यात आल्याचे सहा.अभियंता मिलींद किटवाडकर यानी सांगितले.