काश्मीरमध्ये पायी जाण्याऐवजी वाहन वापरण्याचा सल्ला ः पंजाबमध्येही सुरक्षा भेदण्याचा प्रकार उघड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आली असतानाच पुन्हा एकदा सुरक्षेसंबंधी अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या ही यात्रा पंजाबमध्ये असून आता काश्मीरमध्ये प्रवेश करणार आहे. काश्मीरमधील प्रवासादरम्यान चालत जाण्याऐवजी वाहनातून प्रवास करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी पंजाबमधील पायी यात्रेवेळी दोनवेळा त्यांची सुरक्षा भेदण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत अलर्ट जारी केला आहे. सुरक्षा यंत्रणांनी राहुल गांधी यांना काश्मीरमध्ये पायी न फिरण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सुरक्षेसाठी आराखडा तयार करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. काँग्रेसची भारत जोडो यात्रा 19 जानेवारीला जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचत आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या यात्रेचा हा शेवटचा टप्पा असून 30 जानेवारी रोजी काश्मीरमध्ये सांगता होणार आहे.
वरुण गांधींसंबंधी महत्त्वाचे वक्तव्य
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंजाबमधील भारत जोडो यात्रेदरम्यान भाजप खासदार वरुण गांधी यांच्याबाबत वक्तव्य केले. आपण वरुण गांधींना आलिंगन देऊ शकतो, पण त्यांच्या विचारसरणीच्या विरोधातच राहणार असल्याचे ते म्हणाले. तसेच आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. वरुणने दुसरी विचारधारा निवडली. ती विचारधारा मी स्वीकारू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

सुरक्षा भेदण्याचे प्रकार
मंगळवारी सकाळी 8.05 वाजता जालंधर-पठाणकोट मार्गावर होशियारपूरमधील दसुहाजवळ राहुल गांधींचा तीन-स्तरीय सुरक्षा घेरा तोडण्यात एका तरुणाला यश आले. एका तरुणाने थेट राहुल यांच्याकडे धाव घेत त्यांना आलिंगन दिले. अन्य एका घटनेत सकाळी 8.40 वाजता चहापानासाठी यात्रा होशियारपूरमधील बस्सी गावात थांबली असता अन्य एक तरुण त्यांच्या अगदी जवळ पोहोचल्याचे दिसून आले. या दोन्ही घटना 35 मिनिटांत घडल्या. राहुल गांधींना पंजाबमध्ये जास्तीत जास्त सुरक्षा देण्यात आली असताना या घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंबंधी राहुल गांधी यांनी ही सुरक्षेची चूक नसून अशा घटना उत्स्फूर्तपणे घडत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.









