अतिक-अशरफ बंधूंचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात : हल्लेखोरांची नैनीताल कारागृहात रवानगी
वृत्तसंस्था/ प्रयागराज
उत्तर प्रदेशमधील कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच हिंसा किंवा तणाव टाळण्यासाठी इंटरनेट वापरावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. या हत्यांप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत नैनी मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर अतिक आणि अशरफ यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून दोन दिवसांपूर्वीच एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलेल्या असद अहमद याच्या कबरीजवळच दोघांना दफन केले जाणार असल्याचे समजते.
कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची शनिवारी रात्री प्रयागराजमध्ये हत्या करण्यात आली. प्रयागराज येथे पत्रकारांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी अत्यंत जवळून 18 राऊंड फायर करून दोघा भावांची हत्या केली. पोलिसांनी दोघांनाही वैद्यकीय चाचणीसाठी ऊग्णालयात नेले होते. याचदरम्यान पत्रकारांशी बोलत असताना तीन हल्लेखोरांनी पोलिसांचा सुरक्षा घेरा तोडून अतिकच्या डोक्मयात गोळी झाडली, त्यानंतर अशरफवर गोळीबार केला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. लवलेश तिवारी, सनी आणि अऊण मौर्य अशी हल्लेखोरांची नावे आहेत. हल्ल्यानंतर तिघांनाही पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या हल्ल्यादरम्यान कॉन्स्टेबल मानसिंग यांनाही गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या खळबळजनक हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.
मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
अतिक-अशरफ यांच्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम रविवारी सायंकाळी करण्यात आले. त्यानंतर त्यांचे मेव्हणे आणि नातेवाईकांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. दोघांचे पार्थिव कासारी-मासारी येथील त्यांच्या वडिलोपार्जित स्मशानभूमीत दफन करण्यात येणार आहे. अतिक यांचा मुलगा असद याच्या कबरीजवळ दोघांच्या कबरी खोदण्यात आल्या आहेत. अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत निवडक नातेवाईकांनाच जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसात घडलेल्या या वेगवाग घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी सुसज्ज फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
‘मेड इन तुर्कस्थान’ पिस्तूलमधून गोळीबार
कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या पोलिसांच्या देखत झालेल्या हत्याकांडाबाबत एकदम नवीनच माहिती समोर आली आहे. ज्या पिस्तुलातून अतिक आणि त्याच्या भावाला मारले ते पिस्तूल तुर्कस्थान बनावटीचे असून ‘जिगाना’ कंपनीचे आहे. अशा प्रकारची पिस्तुले ही पाकिस्तानातून भारतात अनधिकृतरित्या आयात केली जातात अशी देखील माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे अतिकच्या हत्येचे कनेक्शन पाकिस्तानशी तर नाही ना याचा तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.
लोकप्रियता टाळण्यासाठी हत्येचा कट?
हत्येमध्ये सामील असलेल्या लवलेश तिवारी (बांदा), मोहित उर्फ सनी (हमीरपूर) आणि अऊण मौर्य (कासगंज) यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलांचा स्त्रोत तपासण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. त्यासंबंधी थोडीफार माहिती उपलब्ध झाली असली तरी त्याचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही. आतापर्यंतच्या तपासानुसार हा गोळीबार कोणत्याही माफिया किंवा गुंड किंवा बाहुबलीच्या सांगण्यावरून करण्यात आलेला नसून, तीन हल्लेखोरांनी स्वत: हे हत्याकांड घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही माफियांची लोकप्रियता विनाकारण वाढत असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा प्राथमिक चौकशीत हल्लेखोरांनी केल्याचे समजते.
हत्याकांड तपासासाठी न्यायिक आयोग स्थापन
या हत्येचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या गृह विभागाने 3 सदस्यीय न्यायिक आयोगाची स्थापना केली आहे. हा आयोग दोन महिन्यात या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सरकारला सादर करेल. या आयोगाचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरविंद कुमार त्रिपाठी असतील. यात निवृत्त डीजीपी सुभेश सिंह, निवृत्त जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रिजेशकुमार सोनी यांचाही समावेश करण्यात आला आहे.









