जागतिक अॅथलेटिक्स : 100 मीटर हर्डल्समध्ये ज्योती याराजीला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
लांब उडीतील राष्ट्रीय विक्रमधारक जेस्विन ऑल्ड्रिन पहिल्यांदाच जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे, तर त्याचा सहकारी प्रतिस्पर्धी मुरली श्रीशंकरवर मात्र बुधवारी येथे कमी दर्जाच्या प्रदर्शनानंतर पात्रता फेरीतच बाहेर पडण्याची पाळी आली.
मार्चमध्ये आपल्या 8.42 मीटर राष्ट्रीय विक्रमाच्या प्रयत्नासह हंगामात आघाडीवर राहिलेल्या ऑल्ड्रिनने येथे पहिल्या प्रयत्नात 8 मीटरचे अंतर पार केले आणि त्याच्या पुढील दोन उडी ‘फाऊल’ ठरल्या. पण आज गुरुवारी होणाऱ्या आणि 12 जणांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत पोहोचण्यास ते पुरेसे ठरले. दोन पात्रता गटांतील आघाडीच्या 12 खेळाडूंनी किंवा ज्यांनी 8.15 मीटरचे पात्रता अंतर पार केले आहे त्यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. पात्रता फेरीत ‘गट ब’मध्ये सहाव्या स्थानावर राहिलेला ऑल्ड्रिन हा एकूण 12 वा सर्वोत्तम कामगिरी करणारा लांब उडीपटू राहिला आणि त्याच्या जोरावर त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुसरीकडे, श्रीशंकरने मारलेल्या 7.74 मीटर, 7.66 मीटर आणि 6.70 मीटर या लांब उड्या म्हणजे निराशाजनक मालिका ठरली. कारण तो पात्रता फेरीत ‘गट अ’मध्ये 12 व्या आणि एकूण 22 व्या स्थानावर राहिला. 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत अविनाश साबळेला अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आल्यानंतर श्रीशंकरचे पात्रता फेरीत बाहेर पडणे हे भारतीय गोटाला आणखी एक धक्का देऊन गेले आहे. कारण तो किमान अंतिम फेरीत तरी पोहोचेल अशी अपेक्षा होती.
श्रीशंकरने या मोसमात खरे तर ऑल्ड्रिनपेक्षा अधिक सातत्य राखले आहे. त्याने अनेक प्रसंगी 8 मीटरचा टप्पा ओलांडला. जूनमध्ये भुवनेश्वरमध्ये त्याने मारलेली 8.41 मीटरची लांब उडी ही त्याच वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी असून जुलैमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत 8.37 मीटरचे अंतर कापून मिळविलेल्या रौप्यपदकाच्या जोरावर त्याने जागतिक स्पर्धेत प्रवेश केला होता. पण पॅरिस डायमंड लीगमध्ये तिसरा क्रमांक पटकावणारा श्रीशंकर अपेक्षांना जागू शकला नाही. दुसरीकडे, ऑल्ड्रिनसाठी जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होण्याची ही दुसरी खेप होती. अमेरिकेत झालेल्या 2022 च्या स्पर्धेत पात्रता फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले होते.
दुसरीकडे, राष्ट्रीय विक्रमधारक 100 मीटर हर्डल्सपटू ज्योती याराजीला जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरता आलेले नाही. आणखी एक निराशाजनक कामगिरी करताना ती सातव्या स्थानावर राहिली. 23 वर्षीय याराजीने 13.05 सेकंदांची वेळ नोंदवल्याने आपल्या गटात ती सातव्या, तर एकूण 29 व्या क्रमांकावर राहिली.









