हुरकेझ, बेरेटिनी, डिमिट्रोव्ह, सित्सिपस, क्विटोव्हा पराभूत
वृत्तसंस्था/ लंडन
येथे सुरू असलेल्या 2023 च्या टेनिस हंगामातील विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अॅलकॅरेझ सर्बियाचा माजी टॉप सिडेड आणि विद्यमान द्वितीय मानांकित नोव्हॅक जोकोविच यांनी पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला विभागात कझाकस्तानची तृतीय मानांकित आणि विद्यमान विजेती इलेना रिबाकिनाने शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले आहे.
ग्रासकोर्टवरील सुरू असलेल्या या स्पर्धेत स्पेनच्या टॉप सिडेड कार्लोस अॅलकॅरेझने मॅटो बेरेटिनीचा 3-6, 6-3, 6-3, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. 2021 साली या स्पर्धेत मॅटो बेरेटिनीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. अॅलकॅरेझ आणि मॅटो बेरेटिनी यांच्यातील हा सामना 3 तास चालला होता. आता अॅलकॅरेझचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रुमानियाच्या 20 वर्षीय होल्गेर रुनेशी होणार आहे. रुमानियाच्या होल्गेरने बल्गेरियाच्या ग्रिगोर डिमिट्रोव्हचा 3-6, 7-6(8-6), 7-6(7-4), 6-3 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. या स्पर्धेत रुनेने पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
सर्बियाच्या द्वितीय मानांकित आणि या स्पर्धेत आतापर्यंत सातवेळा विजेतेपद मिळवणाऱ्या सर्बियाच्या द्वितीय मानांकित जोकोविचने हुबर्ट हुरकेझचा 7-6(8-6), 7-6(8-6), 5-7, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या जोकोविचला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी जवळपास तीन तास झगडावे लागले. जोकोविचने या स्पर्धेत 14 वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. विम्बल्डन स्पर्धेतील जोकोविचचा हा 100 सामना होता तर जोकोविचचा हा 90 विजयी सामना ठरला. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात रशियाच्या तृतीय मानांकित डॅनील मेदव्हेदेवने पुढील फेरीत प्रवेश मिळवला. या सामन्यात त्याचा प्रतिस्पर्धी बिगर मानांकित लिहेका दुखापतीमुळे निवृत्त झाल्याने मेदव्हेदेवने हा सामना 6-4, 6-2 अशा फरकाने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. मेदव्हेदेवचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अमेरिकेच्या ख्रिस्टोफर युबँक्सबरोबर होणार आहे. अमेरिकेच्या यु बँक्सने ग्रीकच्या स्टिफॅनोस सित्सिपसचा 3-6, 7-6(7-4), 3-6, 6-4, 6-4 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले.
महिला एकेरीच्या झालेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात कझाकस्तानच्या विद्यमान विजेत्या इलेना रिबाकिनाने ब्राझीलच्या हेदाद माइयाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. या सामन्यात पहिल्या सेटमध्ये रिबाकिना 4-1 अशी आघाडीवर असताना हेदाद माइयाला पाठ दुखापतीच्या वेदना सुरू झाल्या. टेनिस कोर्टवर प्रथमोपचार करण्यात आले पण तिला वेदना असह्या झाल्याने तिने हा सामना अर्धवट सोडला. रिबाकिनाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ट्युनेशियाच्या जेबॉरशी होणार आहे. बेलारुसच्या द्वितीय मानांकित साबालेन्काने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवताना रशियाच्या अॅलेक्सेंड्रोवाचा 6-4, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. आता साबालेन्काचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या मॅडिसन किजबरोबर होणार आहे. अमेरिकेच्या मॅडिसन किजने 16 वर्षीय मीरा अँड्रीवाचा 3-6, 7-6(7-4), 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. ट्युनेशियाच्या जेबॉरने झेकच्या पेत्रा क्विटोव्हाचा 6-0, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.