वृत्तसंस्था/ नाईस (फ्रान्स)
येथे सुरू झालेल्या हॉपमन चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सिडेड आणि 2023 च्या विम्बल्डन स्पर्धेतील विजेता कार्लोस अॅलकॅरेझने आपला पहिला विजय नोंदवला. स्पेन आणि बेल्जियम यांच्यातील या लढतीमध्ये अॅलकॅरेझने पहिल्या एकेरी सामन्यात बेल्जियमच्या डेविड गोफिनचा पराभव केला.
अॅलकॅरेझने एकेरीच्या सामन्यात गोफिनवर 4-6, 6-4, 10-8 अशी मात करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सदर स्पर्धा दक्षिण फ्रान्समधील नाईस लॉन टेनिस क्लबच्या कोर्टवर खेळवली जात आहे. सदर स्पर्धा मिश्र सांघिक स्वरुपाची असून यामध्ये एकेरी आणि दुहेरीचे सामने खेळवले जात आहेत.
अॅलकॅरेझने गेल्या रविवारी विम्बल्डन ग्रॅडस्लॅम स्पर्धेचे पहिल्यांदाच अजिंक्यपद मिळवताना सर्बियाच्या अनुभवी आणि विद्यमान विजेत्या नोव्हॅक जोकोविचचा 5 सेट्समधील लढतीत पराभव केला होता. या स्पर्धेनंतर अॅलकॅरेझचा हा पहिला एकेरीतील विजय आहे. आता अॅलकॅरेझ हॉपमन चषक स्पर्धेत बेल्जियमविरुद्ध मॅसे रोव्हासमवेत दुहेरीचा सामना खेळणार आहे.









