वृत्तसंस्था / टोकियो
अव्वल क्रमांकावर असलेल्या कार्लोस अल्कारेझने मंगळवारी जपान ओपनच्या अंतिम फेरीत पाचव्या मानांकित टेलर फ्रिट्झचा 6-4, 6-4 असा पराभव करुन या वर्षीचे आठवे जेतेपद पटकाविले. अल्कारेझच्या कारकिर्दीतील 24 व्या एकेरी जेतेपदाने गेल्या आठवड्यात लेव्हर कप टीम इव्हेंटमध्ये फ्रिट्झकडून दोन सेटमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली. या स्पॅनिश खेळाडूने आपला हंगामातील सर्वोत्तम 67-7 असा विक्रमही सुधारला आणि हंगामाच्या अखेरच्या क्रमांक 1 रँकिंगच्या मार्गावर वाटचाल केली आहे. टोकियोमधील अंतिम सामना अल्कारेझसाठी मार्चपासूनचा नववा अंतिम सामना होता. मार्चमध्ये मियामी मास्टर्स स्पर्धेत अल्कारेझ पहिल्या फेरीत पराभूत झाला होता. अंतिम सामन्यांचे त्याचे रेकॉर्ड 7-2 असे आहे. त्यापैकी एक विम्बल्डनमध्ये जेनिक सिनरविरुद्ध झाला होता.









