वृत्तसंस्था/ बार्सिलोना
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या बार्सिलोना खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा विद्यमान विजेता कार्लोस अॅलकॅरेझने इव्हान्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तसेच ग्रीकच्या द्वितीय मानांकित सित्सिपसने मुसेटीचे आव्हान संपुष्टात आणत या स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. अॅलकॅरेझ आणि सित्सिपस यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विद्यमान विजेत्या अॅलकॅरेझने डॅन इव्हान्सचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत ग्रीकच्या द्वितीय मानांकित सित्सिपसने लोरेन्झो मुसेटीचा 6-4, 5-7, 6-3 असा पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत स्पेनच्या अॅलकॅरेझने सित्सिपसचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला होता. आतापर्यंत उभय खेळाडूंमध्ये तीनवेळा गाठ पडली असून त्यात अॅलकॅरेझने विजय मिळवले आहेत. गेल्या आटवड्यात झालेल्या माँटे कार्लो टेनिस स्पर्धेत पाठ दुखापतीमुळे अॅलकॅरेझने सहभाग दर्शवला नव्हता. शनिवारच्या उपांत्य सामन्यात अॅलकॅरेझला विजयासाठी 80 मिनिटे झगडावे लागले.









