रुड, होल्गर रुने, कॅरेन खचानोव्ह यांचेही विजय, रुबलेव्ह, शॅपोव्हॅलोव्ह यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ पॅरिस
जागतिक चौथ्या मानांकित कॅस्पर रुडने एक सेटची पिछाडी भरून काढत चीनच्या झँग झिझेनचा पराभव करून फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची चौथी फेरी गाठली तर स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने चौथी फेरी गाठताना डेनिस शॅपोव्हॅलोव्हचे आव्हान संपुष्टात आणले. याशिवाय लॉरेन्झो सोनेगोने आंद्रे रुबलेव्हला पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. पोलंडची इगा स्वायटेक व डेन्मार्कचा व्होल्गर रुने यांनीही चौथी फेरी गाठली आहे.
मागील वर्षीच्या उपविजेत्या कॅस्पर रुडने झिझेनवर 4-6, 6-4, 6-1, 6-4 अशी मात केली. झिझेन हा जागतिक क्रमवारीत 71 व्या स्थानावर असून 1936 नंतर या स्पर्धेची चौथी फेरी गाठणारा पहिला चायनीज खेळाडू होण्याचा तो प्रयत्न करीत होता. सलग पाचव्यांदा तिसऱ्या फेरीत खेळणाऱ्या कॅस्पर रुडची पुढील लढत चिलीचा निकोलास जॅरी किंवा मार्कोस गिरॉन यापैकी एकाशी होईल. स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने शानदार प्रदर्शन करीत कॅनडाच्या 26 व्या मानांकित डेनिस शॅपोव्हॅलोव्हचे आव्हान 6-1, 6-4, 6-2 असे संपुष्टात आणले. दुसऱ्या सेटमध्ये अल्कारेझ काही वेळ 1-4 असे पिछाडीवर पडला होता. त्यानंतर त्याने सलग सात गेम्ह जिंकत विजय साकार केला. त्याची चौथ्या फेरीची लढत इटलीच्या 17 व्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीशी होईल. शॅपोव्हॅलोव्हने मागे विम्बल्डनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण येथे तो पहिल्यांदाच तिसऱ्या फेरीत खेळत होता.
सोनेगोचा रुबलेव्हला धक्का
जागतिक 48 व्या मानांकित इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोने सनसनाटी विजय मिळविताना जागतिक सातव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हला 5-7, 0-6, 6-3, 7-6 (7-5), 6-3 असे पाच सेट्सच्या झुंजीत नमवित स्पर्धेबाहेर घालविले. तीन तास 45 मिनिटे ही झुंज रंगली होती. त्याची पुढील लढत 11 व्या मानांकित कॅरेन खचानोव्हशी होईल. खचानोव्हने प्रेंच ओपनमधील 20 वा विजय मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या थानासी कोकिनाकिसचा 6-4, 6-1, 3-6, 7-6 (7-5) असा पराभव करून सहाव्यांदा या स्पर्धेची चौथी फेरी गाठली. 2019 मध्ये त्याने येथे उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. अन्य एका सामन्यात डेन्मार्कच्या सहाव्या मानांकित होल्गर रुनेने अर्जेन्टिनाच्या जेनारो अल्बर्टो ऑलिव्हिएरीचा 6-4, 6-1, 6-3 असा पराभव करीत चौथ्या फेरीत स्थान मिळविले.
स्वायटेकने साधले डबल बॅजेल
महिला एकेरीत विद्यमान विजेत्या पोलंडच्या अग्रमानांकित इगा स्वायटेकने चीनच्या वांग झिनयूचा 6-0, 6-0 असा डबल बॅजेल धुव्वा उडवित जेतेपद स्वत:कडेच राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. पाच वर्षांत तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यावर तिचे लक्ष लागले आहे. येथील सामना तिने केवळ 51 मिनिटांत संपवत चौथी फेरी गाठली.
इलेना रीबाकिनाची आजारपणामुळे माघार
चौथ्या मानांकित व विजेतेपदाची एक दावेदार असलेल्या कझाकच्या रीबाकिनाला व्हायरल इन्फेक्शनमुळे प्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले आहे. तिसऱ्या फेरीचा तिचा सामना सारा सॉरिबेस टोर्मोशी होणार होता. या स्पर्धेआधी झालेल्या रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत तिने जेतेपद पटकावले होते आणि येथे संभाव्य जेतेपदाची दावेदार म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते. गेल्या दोन दिवसापासून आपल्याला बरे वाटत नव्हते, त्यामुळेच माघारीचा निर्णय घ्यावा लागल्याचे तिने सांगितले. ‘गेले दोन दिवस मला ताप आला होता. त्यामुळे दोन रात्री मी झोपू शकले नाही. आज सराव करताना, आपण माघार घेणेच योग्य ठरेल, असे वाटले. अशा परिस्थितीत खेळणे योग्य नव्हे, म्हणून मी माघार घेतली,’ असे तिने पत्रकार परिषदेत सांगितले.