वृत्तसंस्था / बिजिंग
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या चायना खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा तृतिय मानांकित कार्लोस अल्कारेझ तसेच महिलांच्या विभागात एरिना साबालेंका यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
पुरूष एकेरीच्या सोमवारी झालेल्या सामन्यात तृतिय मानांकीत अल्कारेझने कॅचेनोव्हचा 7-5, 6-2 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. या स्पर्धेत अल्कारेझने सलग दुसऱ्या वर्षी उपांत्य फेरी गाठली आहे. अल्कारेझचा उपांत्य फेरीचा सामना रशियाच्या डॅनील मेदव्हेदेवशी होणार आहे. मेदव्हेदेवने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या कोबोलीवर 6-2, 6-4 असा विजय मिळविला. अन्य एका सामन्यात रशियाच्या रुबलेव्हने फोकिनाचा 6-4, 7-5 असा पराभव केला.
महिलांच्या विभागात एरिना साबालेंकाने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना व्रुगेरचा 6-2, 6-2 असा फडशा पाडला. साबालेंकाचा अलिकडच्या कालावधीतील एकेरीतील हा सलग 14 वा विजय आहे. आता साबलेंकाची पुढील फेरीतील लढत मॅडीसन किज बरोबर होणार आहे. मॅडीसन किजने ब्राझीलच्या हेदाद माईयाचा 6-3, 6-3 तसेच जपानच्या नाओमी ओसाकेने केटी व्हॉलेंटीसचा 6-4, 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले आहे.