लंडन
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या क्विन्स क्लब ग्रासकोर्ट पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अलकॅरेझने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना रिंडेनकेनिचचा सरळ सेट्समध्ये पराभव केला. त्याचप्रमाणे डेन्मार्कच्या होल्गेर रुनेने शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले आहे. 3 जुलैपासून येथे सुरु होणाऱ्या विंबल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही सरावाची स्पर्धा आहे.
पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात 20 वर्षीय अॅलकॅरेझने आर्थर रिंडेरकेनीचचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना 90 मिनिटे चालला होता. आता बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह आणि सेरुनडोलो यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर अॅलकॅरेझचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. दुसऱ्या एका सामन्यात डेन्मार्कच्या रुनेने रियान पेन्स्टिनवर 6-3, 6-4 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रुने आणि मुसेटी यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. मुसेटीने शेल्टनचा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले आहे. अमेरिकेच्या सेबेस्टियन कोर्दाने आपल्या देशाच्या टिफोईवर 7-6 (7-2), 6-3 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले आहे.