वृत्तसंस्था/ बार्सिलोना
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या बार्सिलोना खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारेझ आणि डेन्मार्कचा होल्गेर रुने यांनी एकेरीची अंतिम फेरी गाठली.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात द्वितीय मानांकित अल्कारेझने फ्रान्सच्या सातव्या मानांकित आर्थर फिल्सचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरी गाठली. स्पेनच्या अल्कारेझने 2022 आणि 2023 साली बार्सिलोना टेनिस स्पर्धा जिंकली होती. तर 2025 च्या टेनिस हंगामात त्याने एटीपी टूरवरील तिसऱ्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी त्याने रोटरडॅम आणि माँटेकार्लो स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या उपांत्य सामन्यात डेन्मार्कच्या रुनेने रशियाच्या कॅरेन कॅचेनोव्हचा 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. रुनेने या स्पर्धेत उपांत्यपूर्व स्पर्धेच्या लढतीत नॉर्वेच्या विद्यमान विजेत्या कास्पर रुडचा पराभव केला.









