फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम : मोनफिल्स, मुसेटीही विजयी, मुचोव्हा पराभूत तर जोकोविचची माघार
वृत्तसंस्था/ पॅरिस
सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने प्रेंच ओपन स्पर्धेतील पहिला सामना जिंकला असला तरी त्याने उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात कार्लोस अल्कारेझ, लॉरेन्झो मुसेटी, जस्मिन पाओलिनी, एलिना स्विटोलिना, चीनची किनवेन झेंग यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
जोकोविचने कारकिर्दीत गेल्या वर्षी याच ठिकाणी बहुप्रतीक्षित ऑलिम्पिक सुवर्ण मिळविण्याचा सर्वोच्च क्षण अनुभवला तर आज प्रेंच ओपनमधून माघार घेण्याचा सर्वात खालच्या टप्प्याचा अनुभवही मिळाला. येथील सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये काही अडथळे वगळता त्याने 98 व्या मानांकित अमेरिकेच्या मॅकी मॅकडोनाल्डच 6-3, 6-3, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली होती. पण दुखापतीमुळे त्याने नंतर स्पर्धेतूनच माघार घेतली. हा सामना अखेरच्या टप्प्यात प्रकाशझोतात आणि बंद छताखाली खेळविण्यात आला. जोकोविचने आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत.
दुसऱ्या मानांकित अल्कारेझने फॅबियन मारोझावर 6-1, 4-6, 6-1, 6-2 अशी मात केली तर आठव्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीने डॅनियल गालाचा 6-4, 6-0, 6-4, महिलांमध्ये चौथ्या मानांकित जस्मिन पाओलिनीने अॅला टोमलानोविचचा 6-3, 6-3, तेराव्या मानांकित स्विटोलिनाने अॅना बॉन्डरचा 7-6 (7-4), 7-5, आठव्या मानांकित झेंग किनवेनने एमिलियाना अॅरांगोचा 6-2 6-3 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली.
बिगरमानांकित अमेरिकेच्या अॅलीसिया पार्क्सने 14 व्या मानांकित कॅरोलिना मुचोव्हाचे आव्हान पहिल्या फेरीत 6-3, 2-6, 6-1 असे संपुष्टात आणले. 2023 मध्ये मुचोव्हाने येथील स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. 18 वर्षीय जोआव फोन्सेकाने 30 व्या मानांकित ह्युबर्ट हुकराझवर 6-2, 6-4, 6-2 अशी मात केली तर फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने दोन सेटची पिछाडी भरून काढत बोलिव्हियाच्या ह्युगो डेलियनवर 4-6, 3-6, 6-1, 7-6 (7-4), 6-1 अशी मात केली. तीन तासांहून अधिक वेळ ही लढत रंगली होती. सामन्याच्या पाचव्या गुणावेळी मोनफिल्स घरसल्याने बाजूच्या बिलबोर्डला आदळला. त्यावर त्याने उपचार करून घेतले. जागतिक क्रमवारीत तो 42 व्या स्थानावर आहे. त्याला वारंवार उजवा गुडघा व पायाच्या दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. ब्रिटनच्या जेकब फीयर्नलीने स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आणले.
बोलिपल्ली-बॅरिएन्टोस फ्रेंच ओपनमधून बाहेर
रुत्विक बोलिपल्लीला ग्रँडस्लॅममधील पहिल्या विजयासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असून कोलंबियन जोडीदार निकोलस बॅरिएन्टोस यांना पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. कॅनडाचा गॅब्रियल डायलो व ब्रिटनचा जेकब फीयर्नली केवळ 56 मिनिटांत 6-0, 6-2 असा धुव्वा उडविला. गेल्या मार्चमध्ये बोलिपल्ली व बॅरिएन्टोस यांनी एटीपी 250 चिली ओपन स्पर्धेत जेतेपद मिळविले होते.









