वृत्तसंस्था/ रोम
स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने इटलीच्या जेनिक सिनरचा पुन्हा एकदा पराभव करून येथे झालेल्या इटालियन मास्टर्स ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले.
अल्कारेझने सिनरचा 7-6 (7-5), 6-1 असा पराभव करून ही स्पर्धा पहिल्यांदाच जिंकताना आणखी एक क्ले कोर्टवरील जेतेपद मिळविले. मागील वर्षीच्या सुरुवातीपासून अल्कारेझने सिनरला हरविले असून सलग चौथ्यांदा त्याने सिनरवर मात केली आहे. सिनरच्या घरच्या प्रेक्षकांसमोरच अल्कारेझने त्याची 26 सामन्यांची विजयी मालिका खंडित केली. मागील वर्षीच्या ऑक्टोबरपासून त्याची ही विजयी मालिका सुरू झाली होती. येत्या रविवारपासून फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम सुरू होत असून या जेतेपदाने ‘फ्रेंच स्पर्धा जिंकण्याचा संभाव्य दावेदार’ हा दावा अल्कारेझने आणखी भक्कम केला आहे. या स्पर्धेचा तो विद्यमान विजेता आहे. अल्कारेनझने माद्रिद ओपन स्पर्धा 2022 व 2023 मध्ये जिंकली होती. त्यामुळे सर्व तीन मास्टर्स 1000 स्पर्धा जिंकणारा एकंदर पाचवा खेळाडू बनला आहे. याआधी राफेल नदाल, नोव्हॅक जोकोविच, गुस्टाव्ह कर्टन मार्सेलो रिओस यांनी हा बहुमान मिळविला होता.
महिला एकेरीत इटलीच्या जस्मिन पाओलिनीने जेतेपद पटकावले. नंतर तिने सारा इराणीसमवेत महिला दुहेरीचे जेतेपदही स्वत:कडेच राखण्यात यश मिळविले मात्र पुरुष एकेरीचे जेतेपद इटलीच्या सिनरला मिळविता आले नाही. पाओलिनी ही एकाच वर्षात इटालियन ओपनमध्ये महिला एकेरी व महिला दुहेरीत अजिंक्यपद मिळविणारी 1990 नंतरची पहिला महिला टेनिसपटू आहे. 1990 मध्ये मोनिका सेलेसने हा पराक्रम केला होता.









