अमेरिकन ओपन टेनिस : डिमिट्रोव्ह, इव्हान्स, वावरिंका, ब्युरेल, मर्टन्स यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अल्कारेझ, रशियाचा तृतीय मानांकित डॅनियल मेदव्हेदेव, जर्मनीचा व्हेरेव, इटलीचा सिनेर यांनी तर महिलांच्या विभागात द्वितीय मानांकित साबालेंका, पोलंडची टॉप सिडेड स्वायटेक, अमेरिकेची कोको गॉफ, कॅसेटकिना यांनी चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला. दरम्यान बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह, स्वीसचा वावरिंका, ब्रिटनचा इव्हान्स, त्याचप्रमाणे महिलांच्या विभागात क्लेरा ब्युरेल, बेल्जियमची इलेसी मर्टन्स त्याचप्रमाणे मिनेन यांचे आव्हान तिसऱ्या फेरीतच समाप्त झाले.

शनिवारी येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात स्पेनचा टॉप सिडेड अॅल्कारेझने ब्रिटनच्या इव्हान्सचा 6-2, 6-3, 4-6, 6-3 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळवले. हा सामना तीन तास चालला होता. दुसऱ्या एका सामन्यात जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवने बल्गेरीयाच्या डिमिट्रोव्हचे आव्हान 6-7(2-7), 7-6(8-6), 6-1, 6-1 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळवले. व्हेरेवचा चौथ्या फेरीतील सामना इटलीच्या सिनेरशी होणार आहे. दोन आठवड्यापूर्वीच सिनसिनॅटी स्पर्धेत व्हेरेवने डिमिट्रोव्हचा पराभव केला होता. इटलीच्या सिनेरने स्वीसच्या वावरिंकाचा 6-3, 2-6, 6-4, 6-2 असा पराभव केला. रशियाच्या तृतीय मानांकित मेदव्हेदेवने सबेस्टियन बायेझचा 6-2, 6-1, 7-6(8-6) असा पराभव केला. मेदव्हेदेवचा चौथ्या फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरशी होणार आहे. अमेल्डीने ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीचा 6-3, 6-4, 6-3 असा पराभव केला. जॅक ड्रेपरने रशियाच्या रुबलेवचे आव्हान अमेरिकेच्या मिमोहचा 6-4, 6-2, 3-6, 6-3, रशियाच्या रुबलेवने फ्रान्सच्या रिंडेरकिनेचवर 3-6, 6-3, 6-1, 7-5 अशी मात करत पुढील फेरीत स्थान मिळवले.

महिलांच्या विभागात द्वितीय मानांकित साबालेंकाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना तिसऱ्या फेरीतील सामन्यात क्लेरा ब्युरेलचा 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळवले. साबालेंका आता महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीतील अग्रस्थान मिळवण्यासाठी झगडत आहे. पोलंडच्या इगा स्वायटेकचा चौथ्या फेरीतील सामना ओस्टापेंकोशी होणार आहे. साबालेंकाला चौथ्या फेरीत डेरीया कॅसेटकिनाशी लढत द्यावी लागेल. 13 व्या मानांकित कॅसेटकिनाने मिनेनचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा सामना दीड तास चालला होता. अमेरिकेच्या सहाव्या मानांकित कोको गॉफने बेल्जियमच्या इलेसी मर्टन्सवर 3-6, 6-3, 6-0 अशी मात करत चौथी फेरी गाठली. पोलंडची टॉप सिडेड स्वायटेकने केजा ज्युवेनवर 6-0, 6-1 अशी सहजपणे मात करत चौथी फेरी गाठली. हा सामना स्वायटेकने 50 मिनिटात जिंकला. अमेरिकेच्या मॅडिसन किजने शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी गॉफनंतर किज ही दुसरी अमेरिकन टेनिसपटू आहे. अमेरिकेच्या पेगुलाने चौथ्या फेरीत प्रवेश मिळवताना युक्रेनच्या स्विटोलिनाचे आव्हान 6-4, 4-6, 6-2 असे संपुष्टात आणले. चीनच्या झेंग क्विनवेनने चौथ्या फेरीत स्थान मिळवताना इटलीच्या ब्रोन्झेटीवर 6-3, 4-6, 6-4 अशी मात केली.









