अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम : आंद्र रुबलेव्ह, अलेक्झांडर व्हेरेव्ह, मर्केटा व्होंड्रोसोवा, झेंग क्विनवेन यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अल्कारेझ तसेच रशियाचा मेदव्हेदेव यांनी पुरुष एकेरीची तर अमेरिकेची मॅडिसन किज आणि बेलारुसची आर्यना साबालेंका यांनी महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. मेदव्हेदेवने आपल्याच देशाच्या रुबलेव्हचा तर अल्कारेझने जर्मनीच्या व्हेरेव्हचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. अमेरिकेच्या मॅडिसन किजने व्होंड्रोसोव्हाचे तर साबालेंकाने चीनच्या झेंग क्विनवेनचे आव्हान संपुष्टात आणत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. स्पेनचा टॉप सिडेड अल्कारेझ आणि जर्मनीचा अॅलेक्झांडर व्हेरेव्ह यांच्यातील सामना तीन सेट्समध्ये रंगला. अल्कारेझने व्हेरेव्हचा 6-3, 6-2, 6-4 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. 20 वर्षीय अल्कारेझचा उपांत्य फेरीतील सामना 2021 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या रशियाच्या मेदव्हेदेवशी होणार आहे.
गुरुवारी पुरुष एकेरीच्या अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रशियाच्या मेदव्हेदेवने आपल्या देशाच्या आंद्रे रुबलेव्हचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. मेदव्हेदेवने या स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये तापमान अधिक असल्याने दमट हवामानामुळे दोन्ही खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली होती. 27 वर्षीय मेदव्हेदेवला हा सामना जिंकण्यासाठी जवळपास तीन तास झगडावे लागले. मेदव्हेदेव आणि रुबलेव्ह यांच्यात आतापर्यंत 8 सामने झाले असून त्यापैकी सहा सामने मेदव्हेदेवने तर 2 सामने रुबलेव्हने जिंकले आहेत. मेदव्हेदेव आणि अल्कारेझ यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. त्याचप्रमाणे सर्बियाचा द्वितीय मानांकित नोव्हॅक जोकोविच व बेन शेल्टन यांच्यात उपांत्य फेरीची दुसरी लढत खेळवली जाईल. 2018 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत माजी तीन विजेत्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत जर्मनीच्या व्हेरेव्हने उपांत्यपूर्व फेरी गाठल्याने त्याने एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत पुन्हा पहिल्या 10 खेळाडूत स्थान मिळवले. एटीपी फायनल्स स्पर्धा 12 ते 19 नोव्हेंबर दरम्यान ट्युरीनमध्ये होणार असून या स्पर्धेत अव्वल 10 खेळाडूंना संधी दिली जाते.
मॅडिसन, साबालेन्का विजयी
महिलांच्या विभागात एमरिकेची 17 वी मानांकित मॅडिसन किजने नववी मानांकित आणि विम्बल्डन विजेती झेकच्या मर्केटा व्होंड्रोसोव्हाचा 6-1, 6-4 असा फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. आता अमेरिकेची मॅडिसन किज आणि बेलारुसची साबालेंका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. मॅडिसन किजने व्होंड्रोसोव्हावर हा सलग दुसरा विजय नोंदवला आहे. या लढतीत किजने पहिला सेट केवळ 39 मिनिटात जिंकला. या सामन्यामध्ये मर्केटा व्होड्रोसोव्हाने बेसलाईन खेळावर भर दिला होता. महिला एकेरीच्या अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेलारुसच्या द्वितीय मानांकित आर्यना साबालेंकाने चीनच्या झेंग क्विनवेनचा 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली. झेंगने हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना 75 मिनिटे चालला होता. साबालेंका आणि मॅडिसन किज यांच्या उपांत्य लढत होणार आहे. अग्रमानांकित व विद्यमान विजेत्या इगा स्वायटेकचे आव्हान संपुष्टात आणले होते.









