हॅरीस, हुरकेझ, मरे, युकी, साकेत यांचे आव्हान समाप्त, पराभूत झालेला इस्नेर निवृत्त
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अॅल्कारेझ, डॅनियल इव्हान्स, युक्रेनची स्विटोलिना तसेच ट्युनेशियाची जेबॉर यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा लॉईड हॅरीस, अमेरिकेचा जॉन इस्नेर, हुबर्ट हुरकेझ, ब्रिटनचा माजी टॉप सिडेड अँडी मरे, रशियाची पॅव्हेल चेंकोवा, भारताचे युकी भांब्री आणि साकेत मिनेनी यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. अमेरिकेच्या जॉन इस्नेरने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली.

पुरुष एकेरीच्या गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अॅलकॅरेझने दक्षिण आफ्रिकेच्या लॉईड हॅरीसचा 6-3, 6-1, 7-6(7-4) असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेतील विद्यमान विजेता अॅलकॅरेझ याचा तिसऱ्या फेरीतील सामना डॅनियल इव्हान्सशी होणार आहे. इव्हान्सने अलीकडेच वॉशिंग्टनमधील स्पर्धा जिंकली होती. दुसऱ्या एका सामन्यात डॅनियल इव्हान्सने हॉलंडच्या बोटीक व्हॅन डी झेंडस्कल्पचा 1-6, 6-1, 6-3, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेचा अनुभवी टेनिसपटू जॉन इस्नेर याला या स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीतही पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर इस्नेरने व्यावसायिक टेनिस क्षेत्रातील आपल्या निवृत्तीची घोषणा केली. अमेरिकेच्या इस्नेरने टेनिस क्षेत्रात बिनतोड सर्व्हिस नोंदवण्याचा अनेकवेळा विक्रम केला आहे. या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळवणाऱ्या अमेरिकेच्या मिचेल मिमोहने इस्नेरचा 3-6, 4-6, 7-6(7-3), 6-4, 7-6(10-7) असा पराभव केला. मिमोहने हा सामना पाच सेट्समधील लढतीत जिंकला. हा सामना 4 तास चालला होता. टेनिस क्षेत्रात एकेरीमध्ये इस्नेरने एका सामन्यात 113 बिनतोड सर्व्हिस नोंदवण्याचा विक्रम नोंदवला होता. मिमोह विरुद्धच्या सामन्यात त्याने 48 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. इस्नेर हा विक्रम 2010 च्या विम्बल्डन स्पर्धेत मेहुतविरुद्धच्या सामन्यात नोंदवला होता. हा सामना 11 तास 5 मिनिटे चालला होता. पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात रॉबर्ट गॅलोवे आणि अलबेनो ओलिव्हेटी यांनी जॉन इस्नेर आणि जॅक सॉक या अमेरिकन जोडीचा 6-2, 3-6, 7-6, 10-3 अशा सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले.

पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात ब्रिटनच्या ड्रेपरने हुबर्ट हुरकेझचा 6-2, 6-4, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले तर बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेचे आव्हान 6-3, 6-4, 6-1 असे संपुष्टात आणत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. मिमोहचा तिसऱ्या फेरीतील सामना ब्रिटनच्या ड्रेपरशी होणार आहे. पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या युकी भांब्री आणि साकेत मिनेनी यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. पोलंडची नववी मानांकित जोडी हुगो निस आणि झिलेन्स्की यांनी युकी भांब्री व त्याचा ब्राझीलचा साथीदार डिमोलिनेर यांचा 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. सर्बियाचा डिजेरी आणि त्याचा स्वीसचा साथीदार हुसलेर यांनी साकेत मिनेनी व रशियन साथीदार कॅरेटसोव्ह यांचा 6-7(4-7), 6-3, 6-2 असा पराभव केला. हा सामना दीड तास चालला होता. भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार एबडेन यांनी पहिल्या फेरीतील सामन्यात ओकोनिल आणि व्ह्युकीक यांचा 6-4, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. पुरुष एकेरीच्या सामन्यात स्वीसच्या वावरिंकाने टॉमस इचेव्हेरीचा 7-6(8-6), 6-7(5-7), 6-3, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या विभागात विम्बल्डन विजेती मर्केटा व्होड्रोसोव्हा तसेच ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेती साबालेंका, अमेरिकेची मॅडीसन किज, युक्रेनची स्विटोलिना यांनी आपले सामने जिंकले आहेत. युक्रेनच्या स्विटोलिनाने दुसऱ्या फेरीतील सामन्यात रशियाच्या पॅव्हेलचेंकोव्हाचे आव्हान 5-7, 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. अन्य एका सामन्यात ट्युनेशियाच्या जेबॉरने झेकच्या नोसकोव्हाचा 7-6(7-5,), 4-6, 6-3, मारिया बोजकोव्हाने पेट्रा मार्टिकचा 6-1, 6-2 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळवले.









