वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
अलतगे गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीची यात्रा तब्बल 75 वर्षांनी मंगळवार दि. 25 एप्रिलपासून 3 मेपर्यंत साजरी करण्यात येणार आहे. लक्ष्मीयात्रेसाठी कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीकडून विविध सुविधा पुरवून पूर्ण दक्षता घेतली असल्याची माहिती ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. नऊ दिवस चालणारी यात्रा शांततेत पार पाडण्याचेही आवाहन भाविकांना करण्यात आले. अलतगे गाव कंग्राळी खुर्द ग्रा. पं. कार्यक्षेत्रात येत असल्याने यात्राकाळात नागरी सुविधांची उणीव भासणार नाही, याची आपण काळजी घेत असून कचरा व्यवस्थापन, सांडपाणी नियोजन, वाहतूक कोंडी आदी कोणतीही तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता ग्रा. पं. ने घेतली असून तसे नियोजन केले आहे. मंगळवारी 25 रोजी सकाळी 6.15 वाजता अक्षतारोपणानंतर महालक्ष्मी रथावर विराजमान होऊन गावात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवारी 26 रोजी महालक्ष्मी गदगेवर बसणार असून 3 मे रोजी यात्रेची सांगता होणार आहे. य् ाासाठी सोमवारी ग्रा.पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्षा ज्योती पाटील, पीडीओ जी. आय. भर्गी, सदस्य प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकरसह अन्य सदस्यांनी यात्रा कमिटी सदस्यांशी चर्चा करून यात्रा शांततेत पार पाडण्याबाबत सूचना केल्या. यात्रेला येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देऊन यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.









