विविध गावांमध्ये पांडुरंग हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता, प्रवचन- कीर्तन- आध्यात्मिक कार्यक्रमाचीही रेलचेल
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध गावांमध्ये चैत्र शुद्ध एकादशीनिमित्त तीन दिवस विठुनामाचा गजर झाला. वारकरी व ग्रामस्थांनी पांडुरंग हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून सावळ्या विठुरायाचे विविध अभंग, टाळ म़ृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन गायिले. काकड आरती, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन निरुपण असे आध्यात्मिक कार्यक्रम झाल्यामुळे पश्चिम भाग विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग झाला असल्याचे चित्र दिसले.
पांडुरंग हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आध्यात्माचा जागर करण्यात आला. संत साहित्याचे विचार सर्वसामान्य जनतेला पटवून देण्यात आले. प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आले. पश्चिम भागातील कर्ले, वाघवडे, बिजगर्णी, राकसकोप, सोनोली, खादरवाडी आदी गावातील पांडुरंग हरिनाम सप्ताहाची बुधवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
राकसकोप येथे ग्रामस्थ पंचमंडळ, वारकरी सांप्रदायी मंडळ यांच्यावतीने हरिनाम सप्ताहाचे आयोजन सोमवारपासून करण्यात आले होते. तीन दिवस हा सप्ताह झाला. सोमवारी नितेश महाराज अलतगे यांचे प्रवचन व पुंडलिक पाटील महाराज गुडेवाडी यांचे कीर्तन निरुपण झाले. मंगळवारी दीपोत्सव कार्यक्रम झाला. या सप्ताह सोहळ्यात नित्यपूजा, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ व राकसकोप गावातील भजनी मंडळाचा जागर भजनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी सकाळी दुर्गेश खांडेकर महाराज तुरमुरी यांचे कालाकीर्तन, त्यानंतर मंडपाभोवती दिंडी प्रदक्षिणा झाली. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.
खादरवाडी ब्रह्मलिंग मंदिरात पांडुरंग सप्ताह
खादरवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिरात पांडुरंग सप्ताहाची बुधवारी सांगता झाली. सकाळी दिंडी, नगर प्रदक्षिणा त्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने गाऱ्हाणा कार्यक्रम व दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
कर्लेत पांडुरंग हरिनाम सप्ताह
कर्ले येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित पांडुरंग हरिनाम सप्ताहात भजन, भारुड, सोंगी भजन आदी कार्यक्रम झाले. बुधवारी पहाटे काकड आरती, दुपारी संपूर्ण गावच्यावतीने गाऱ्हाणा कार्यक्रम व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
सोनोली येथे दिंडी सोहळा
सोनोली येथे दिंडी सोहळ्यात वारकरी व ग्रामस्थांची गर्दी दिसून आली. बुधवारी सकाळी पूजा करण्यात आली. टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी विविध अभंग म्हणताना दिसत होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते.
वाघवडे पांडुरंग हरिनाम सप्ताह
वाघवडे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात टाळ मृदंगाच्या गजरात बुधवारी पांडुरंग हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते. बिजगर्णी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह झाला. शशिकांत गावडे यांचे कीर्तन व नंदिहळ्ळी येथील भजनी मंडळाचा भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.









