पिंपरी / प्रतिनिधी :
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज लाखो भाविकांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीत गर्दी केली. महापूजेचा मान दर्शनबारीत उभ्या असणाऱ्या अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील सीआरपीएफ जवान गोरक्ष बाळासाहेब चौधरी आणि आयटी कर्मचारी सविता गोरक्षनाथ चौधरी या दाम्पत्याला मिळाला.
संत ज्ञानेश्वर माऊलींचा 726 वा समाधी सोहळा आळंदीत प्रचंड उत्साहात सुरू आहे. त्यातील आजचा कार्तिकी अर्थात उत्पत्ती एकादशीचा महत्त्वाचा दिवस आहे. रात्री 12 ते पहाटे 2 यावेळेत 11 ब्रम्हवृदांच्या वेदघोषात माऊलींची महापूजा (पवमान अभिषेक व दुधारती) करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. चौधरी या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला.
गोरक्षनाथ चौधरी म्हणाले की, ‘मी ‘सीआरपीएफ’मध्ये छत्तीसगड येथे कार्यरत असून सुट्टीनिमित्त गावी आलो होतो. आमचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो. एकादशीच्या दिवशी आम्हाला महापूजेचा आणि पहिले दर्शन घेण्याचा मान मिळाला हे आमचे भाग्य आहे. माझे वडील वारकरी आहेत. आई-वडिलांच्या पुण्याईने आम्हाला ही संधी मिळाली. सर्वांना सुखात ठेव, असे मागणे आम्ही माऊलींकडे मागितले.
अधिक वाचा : बस झालं; आता बोचकं गुंडाळ!, कोश्यारींच्या वक्तव्याविरोधात आव्हाड आक्रमक
अलंकापुरीत तीन लाखांहून अधिक भाविक
एकादशीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. इंद्रायणी नदी घाट, परिसरातील मठ, मंदिरे, विविध धर्मशाळा या ठिकाणी हरिनाम गजर सुरू असून ‘माऊली, माऊली’ च्या गजराने अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. माऊलींच्या मंदिरात दुपारी 12 ते 12.30 महानैवेद्य, 1 वाजता श्रेंची नगरप्रदक्षिणा, रात्री 8.30 वाजता धुपारती, रात्री 12 ते 2 मोझे यांच्या वतीने जागर आदी कार्यक्रम आहेत.








