अलतगे शिवारात निदर्शनास, शेतकऱ्यांत कुतुहल
बेळगाव : अलतगा येथील शिवारात अळंबींची उगवण झाली आहे. सहसा पावसाळ्यानंतर दिसणारी अळंबी चक्क हिवाळ्यात दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नैसर्गिकरित्या हिवाळ्यात उगवलेल्या अळंबींबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर अळंबींची नैसर्गिक उगवण होते. शिवाय बाजारातदेखील अळंबी विक्रीसाठी दाखल होतात. अळंबी उगवण कमी प्रमाणात असल्याने याचा दरदेखील भरमसाठ असतो. मात्र, अलतगा येथे चक्क हिवाळ्यात अळंबी उगवण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. हणमंत कंग्राळकर यांना ही अळंबी सापडली आहेत. शेतीच्या कामासाठी गेले असता शिवारातील झाडाझुडुपात ही अळंबी निदर्शनास पडली आहेत. त्यांनी कुतुहलाने ही अळंबी घरी आणली आहेत. सहसा पावसाळ्या दरम्यान मिळणारी अळंबी चक्क हिवाळ्यात मिळाल्याने इतर शेतकऱ्यांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे. बदलत्या हवामानामुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम होऊ लागला आहे. हिवाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा असा प्रत्यय येऊ लागला आहे. त्यामुळे शिवारात विशिष्ट हंगामामध्ये उगवणारी अळंबी देखील सर्वच हंगामामध्ये उगवत असल्याचे दिसत आहे. केवळ पावसाळी हंगामामध्ये सापडणारी अळंबी हिवाळ्यात सापडली आहेत.









