संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातून खुलासा : तालिबानशी वाढवतोय मैत्री
वृत्तसंस्था/ श्रीनगर
अल-कायदा ही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीर, बांगलादेश आणि म्यानमामध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करू पाहत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अल-कायदा याकरता अफगाणिस्तानात तालिबानसोबतचे संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. अल कायदा आणि इस्लामिक स्टेटच्या कारवायांवर नजर ठेवणाऱ्या युएनएससीच्या पथकाने हा अहवाल जारी केला आहे.
भारतीय उपखंडात अल-कायदाची एक संघटना एक्यूआयएस (अल-कायदा इन इंडियन सब-कॉन्टिनेंट)चे 200 दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांचा म्होरख्या ओसामा महमूद आहे. तर अफगाणिस्तानात याचे 400 दहशतवादी सक्रीय आहेत. एक्यूआयएस क्षेत्रात इस्लामिक स्टेट खोरासान प्रॉविंससोबत हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
एक्यूआयएसकडून टीटीपीला मदत
ही संघटना टीटीपीत सामील होऊन तालिबानचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. एक्यूआयएस सातत्याने टीटीपीला पाकिस्तानात अधिकाधिक दहशतवादी हल्ले घडवुन आणण्यास मदत करत आहे. आयएसआयएल-केशी निगडित सुमारे 6 हजार दहशतवादी आणि त्यांचे कुटुंबीय अफगाणिस्तानात आहेत. ते सातत्याने स्वत:ची क्षमता वाढवत आहेत. अल कायदा आणि आयएसआयएल-के यांच्यासह अफगाणिस्तानात एकूण 20 दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. संधी मिळताच नव्या क्षेत्रांमध्ये कारवाया घडवून आणण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
अल-कायदाच्या गुप्त कारवाया
ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात सत्तेवर आलेला तालिबान अन् अल-कायदा यांच्यात मोठी जवळीक आहे. अल-कायदा सध्या अफगाणिस्तानात गुप्तपणे कार्यरत आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होत असल्याचा आरोप होऊ नये म्हणून अल-कायदाने स्वत:च्या रणनीतित बदल केला आहे.
एक्यूआयएस
2014 मध्ये अल-कायदाचा तत्कालीन म्होरक्या अयमान अल जवाहिरीने एक्यूआयएस या दहशतवादी संघटनेची निर्मिती केली होती. पाकिस्तानी वंशाचा असीम उमर याचा प्रारंभिक सदस्य होता. तेव्हा अल जवाहिरीने एक व्हिडिओ जारी करत भारताला धमकी दिली होती. एक्यूआयएसचे नेतृत्व आता ओसामा महमूद करत असून तो पाकिस्तानी वंशाचा आहे.









