क्रिस्तियानो रोनाल्डोचे दोन गोल : नऊ खेळाडूसह खेळताना रोनाल्डो ने केली कमाल
अरब
किंग फहद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अल नासरने क्लब चॅम्पियन्स कपवर नाव कोरले. अंतिम सामन्यात अल नासरने ख्रिस्तियानो रोनाल्डोसह 9 खेळाडूंनी खेळून अतिरिक्त वेळेत अल-हिलाल विरुद्ध 2-1 असा विजय मिळवला. स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अल नासरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अल-नासरचे दोन्ही गोल ख्रिस्तियानो रोनाल्डोने केले.

अरब क्लब चॅम्पियन्स चषक ही स्पर्धा अरब देशातील अव्वल क्लब संघांमध्ये खेळवली जाते. त्यात सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिरात, इराक, मोरोक्को, ट्युनिशिया आणि अल्जेरिया या संघांचा समावेश आहे. पूर्वार्धात अल-नासरच्या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, परंतु अल हिलालचा गोलरक्षक मोहम्मद अलोव्हाइसने सॅडिओ माने, सेकोउ फोफाना आणि मार्सेलो ब्रोझोविकचे प्रयत्न अपयशी ठरवले.
उत्तरार्धात सुरुवातीच्या टप्प्यात दोन्ही संघाला गोल करता आला नाही. यानंतर अल-हिलालच्या माल्कमने सहकारी ब्राझीलच्या मायकेलकडे चेंडू पास केला. मायकेलने फ्री हेडरने चेंडू गोलपोस्टवर नेला. यासह अल-हिलाल संघाने 1-0 अशी आघाडी घेतली.
51व्या मिनिटाला मायकलच्या गोलने अल हिलालला आघाडी मिळवून दिली. 71व्या मिनिटाला अब्दुल्लाह अल आमरीला रेड कार्ड दाखविल्यानंतर अल नासरची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. मात्र तीन मिनिटांनी रोनाल्डोने गोल केला. संघाचा आणखी एक खेळाडू नवाद बुशाल यालाही 78 व्या मिनिटाला रेड कार्ड मिळाले. यावेळी अल नासरचे मैदानावर फक्त 9 खेळाडू होते.निर्धारित 90 मिनिटांनंतर दोन्ही संघाचा स्कोअर 1-1 अशा होता. यानंतर 98व्या मिनिटाला रोनाल्डोची जादू पुन्हा एकदा कामी आली. 9 खेळाडूंसह खेळताना त्याने एक गोल करून आपल्या संघाला 2-1 ने आघाडीवर नेले. यानंतर अखेरपर्यंत अल नासर संघाने 2-1अशी आघाडी कायम ठेवत हा सामना जिंकला.









