वृत्तसंस्था/ वेस्ट बँक
पॅलेस्टाईनच्या कब्जातील वेस्ट बँकेत बुधवारी पहाटे एका महिला पत्रकाराचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाने महिला पत्रकाराच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. अल जझीरासाठी काम करणाऱया महिला पत्रकाराचे नाव शिरीन अबू अकलेह असून तिच्या चेहऱयावर गोळी लागली होती. गोळी लागल्यावर त्वरित तिचा मृत्यू झाला. जेनिन शहरातील इस्रायलच्या कारवाईचे शिरिन वृत्तांकन करत होत्या.
उत्तर वेस्ट बँकेतील जेनिन शहरात इस्रायलच्या सैन्याने छापे टाकले होते. यादरम्यान झालेल्या गोळीबारात एक गोळी शिरिन यांना लागली. इस्रायलच्या सैन्यावर त्यांची हत्या करण्याचा आरोप झाला आहे. तर इस्रायलच्या सैन्याकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार बुधवारी संशयित आणि सुरक्षा दलांदरम्यान चकमक झाली आहे, पॅलेस्टिनी समुहाच्या गोळीबारात पत्रकाराचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. इस्रायलचे सैन्य याप्रकरणी तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
पॅलेस्टिनी पत्रकार जखमी
शिरिन या अल जझीरा या वृत्तवाहिनीच्या नावाजलेल्या पत्रकार होत्या. मागील 15 वर्षांपासून त्या इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाचे वृत्तांकन करत होत्या. गोळीबारात जेरूसलेमच्या अल-कुद्स वृत्तपत्रासाठी काम करणारा एक अन्य पॅलेस्टिनी पत्रकारही जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अल जझीराची भूमिका
अल जझीराने इस्रायलच्या सैन्यावर हत्येचा आरोप केला आहे. सैन्य जाणूनबुजून पत्रकारांना लक्ष्य करत असून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघड उल्लंघन करत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या हत्येसाठी इस्रायलच्या सैन्याला जबाबदार ठरवावे असे अल जझीराने म्हटले आहे. इस्रायलचे विदेशमंत्री यायर लापिड यांनी शिरिन यांचा मृत्यू दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. मृत्यूच्या चौकशीसाठी आम्ही पॅलेस्टिनी अधिकाऱयांसोबत एक संयुक्त तपास करण्यासाठी तयार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.









