चित्रपटात इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत
सूर्यवंशी, केसरी अन् गुड न्यूजनंतर अक्षय कुमारसोबत करण जौहरचा आगामी चित्रपट ‘सेल्फी’ येत आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट थेट ओटीटीवर झळकणार असल्याचे समजते. डिस्ने प्लस हॉटस्टारवर तो पहायला मिळू शकतो. याच प्लॅटफॉर्मवर अक्षयचा लक्ष्मी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर त्याचा ‘कटपुतली’ हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी ओटीटीवरच प्रदर्शित होणार आहे.

करण जौहरकडून निर्मित अनेक वेबसीरिज देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्याची वेबसीरिज धर्मेटिक्स नावाच्या बॅनरद्वारे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत राहिल्या आहेत. करण जौहरच्या बिगबजेट चित्रपटांसाठी आता सहनिर्माता म्हणून वायकॉम18 या कंपनीने भागीदारी केली आहे. करण जौहरचा ‘रॉकी और रानी की पेम कहानी’ हा चित्रपट वायकॉम 18 सोबतच्या भागीदारीत प्रदर्शित होणार आहे.
‘सेल्फी’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत इमरान हाश्मी झळकणार आहे. हे दोघेही पहिल्यांदाच मोठय़ा पडद्यावर एकत्र दिसून येणार आहेत. ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या गाण्याला या चित्रपटात रिक्रिएट करण्यात येणार असल्याचे समजते. या चित्रपटात याचबरोबर नुसरत भरूचा तसेच डायना पेंटी या नायिकांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. मल्याळी चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा सेल्फी हा हिंदी रिमेक असणार आहे. राज मेहता यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.









