प्रतिनिधी / पणजी
ज्या शाळेत मध्यान्ह आहार दिला जात नाही तेथे त्याचा पुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सरकारने अर्थात शिक्षण खात्याने अक्षय पात्र फाऊंडेशनची निवड केली आहे. ही निवड झाली असली तरी मध्यान्ह आहार पुरवठा अक्षय पात्रकडे देण्यासाठी कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून सध्या तरी ते कंत्राट स्वयंसेवी गटांकडेच आहे. त्यात कोणताही बदल झालेला नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. अक्षय पात्र बेंगळूरची नामवंत कंपनी असून ती अनेक राज्यांतील शाळांमधून मध्यान्ह आहार देण्याचे काम करीत आहे.
काही शाळांमध्ये स्वयंसेवी गट मध्यान्ह आहार पुरवत नाहीत किंवा काही कारणांमुळे बंद करतात अशा प्रसंगी पर्यायी व्यवस्था म्हणून अक्षय पात्रला राखीव ठेवण्यात आले आहे. सध्या एकूण 98 स्वयंसेवी गटांचे मध्यान्ह आहार पुरवठा कंत्राट एका वर्षासाठी वाढवून देण्यात आले असून आठ पालक-शिक्षक संघांनाही ते मिळाले आहे. ते सर्वजण राज्यातील सुमारे 1.60 लाख मुलांना आहार पुरवण्याचे काम करीत आहेत.
नवीन कंत्राटात एक नियम अंतर्भूत करण्यात आला असून स्वयंसेवी गट गरज पडल्यास बदलता येईल असे त्या नियमात नमूद आहे. एखाद्या गटाने पुरवठा थांबवला तर तो गट बदलून नवीन पुरवठादार गट नेमण्यात येणार आहे. ही पर्याची सोय आहे. अशी सोय आधी करण्यात आली नव्हती. मध्यान्ह आहार पुरवठा कायम रहावा त्यात खंड पडू नये म्हणून हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.









