लेयॉनचे पाच बळी, अक्षरचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाला 62 धावांची आघाडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अक्षर पटेल आणि रविचंद्र अश्विन यांच्या समयोचित शतकी भागीदारीने भारताचा पहिला डाव सावरला. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात केवळ एका धावेची नाममात्र आघाडी घेतल्यानंतर शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 1 बाद 61 धावा जमवत 62 धावांची बढत मिळवली. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी कोलमडली याला केवळ अक्षर पटेल आणि अश्विन यांचा अपवाद म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलियाच्या लेयॉनने 5 गडी बाद केले. अष्टपैलू अक्षर पटेलने 74 धावा झळकवल्या.
चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने नागपूरची पहिली कसोटी केवळ अडीच दिवसात जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दिल्लीच्या दुसऱ्या कसोटीत दमदार खेळ करत सामन्यावर वर्चस्व राखण्यात थोडे फार यशस्वी झाला आहे. या कसोटीतील शनिवारचा दुसरा दिवसही पुन्हा गोलंदाजांनी गाजवला. दिवसभरात 11 गडी बाद झाले.

भारताने बिनबाद 21 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात त्यांनी 57 धावांची भर घालताना चार गडी गमवले. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लेयॉनसमोर भारताचे अव्वल फलंदाज चाचपडत फलंदाजी करत होते. कर्णधार शर्मा आणि के. एल. राहुल यांनी सलामीच्या गड्यासाठी 46 धावांची भर घातल्यानंतर डावातील 18 व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या लेयॉनने केएल राहुलला पायचित केले. त्याने 41 चेंडूत 1 षटकारासह 17 धावा जमवल्या. तत्पुर्वी लेयॉनच्या फिरकीसमोर राहुल दोनवेळा पायचित होताना बचावला होता. ऑस्ट्रेलियाचे राहुल विरुद्धचे दोनवेळा घेतलेले डीआरएसचे निर्णय फेटाळले गेले. दरम्यान राहुलला त्याचा लाभ उठवता आला नाही. राहुल पुन्हा फलंदाजीत अपयशी होत असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. भारतीय संघात राहुलच्या जागी कदाचित गिलला पुढील कसोटीत संधी मिळण्याची शक्यता वाटत आहे. कर्णधार रोहितने ऑस्ट्रेलियन फिरकीसमोर स्वीपच्या फटक्यावर अधिक भर दिला होता पण लेयॉनने टाकलेला चेंडू अधिक वळला नाही आणि रोहितचा अंदाज चुकला. लेयॉनच्या सरळ चेंडूने यष्टी उखडल्या. शर्माने 69 चेंडूत 2 चौकारासह 32 धावा जमवल्या. आपल्या 100 व्या कसोटीत खेळणारा चेतेश्वर पुजारा केवळ 7 चेंडूना तोंड देऊ शकला. लेयॉनच्या पूर्ण वळलेल्या चेंडूवर चुकीचा फटका मारण्याच्या नादात तो खाते उघडण्यापूर्वीच पायचित झाला. दुखापतीतून मुक्त झाल्यानंतर संघात स्थान मिळवणारा श्रेयस अय्यर लेयॉनचा चौथा बळी ठरला. लेयॉनच्या चेंडूवर लेगसाईडच्या दिशेने फटका मारण्याच्या दिशेने तो हँडस्कॉंब करवी झेलबाद झाला. त्याने 15 चेंडूत केवळ 4 धावा जमवल्या. भारताची स्थिती यावेळी 4 बाद 66 अशी होती. विराट कोहली आणि जडेजा यांनी उपाहारापर्यंत अधिक पडझड होऊ दिली नाही. उपाहारावेळी जडेजा 14 तर कोहली 15 धावावर खेळत होते. शनिवारी खेळाच्या पहिल्या सत्रात फिरकी गोलंदाज लेयॉन प्रभावी ठरला.

खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर जडेजा आणि अनुभवी कोहली यांनी बचावात्मक फलंदाजीवर अधिक भर दिला. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. ही जोडी भारताचा डाव सावरेल असे वाटत असतानाच ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज मॅट कुहेनमन आणि टॉड मर्फी यांनी भारताचे दोन फलंदाज बाद केले. टॉड मर्फीने रविंद्र जडेजाला पायचित केले. मर्फीचा खाली राहिलेला चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात जडेजा बाद झाला. त्याने 74 चेंडूत 4 चौकारासह 26 धावा जमवल्या. डावातील 50 व्या षटकात कुहेनमनने विराट कोहलीला पायचित केले. कुहेनमनचा चेंडू पहिल्यांदा पॅडवर की बॅटवर आदळला याबाबत कोहली गोंधळात पडला. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार केलेले पायचितचे अपील पंचांनी उचलून धरत कोहलीला बाद म्हणून घोषित केले. भारताची स्थिती यावेळी 6 बाद 135 अशी होती. भारतीय संघातील नवोदित यष्टीरक्षक आणि फलंदाज एस. भरत लेयॉनच्या गोलंदाजीवर स्मिथकरवी झेलबाद झाला. त्याने 1 चौकारासह 6 धावा जमवल्या. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी अक्षर पटेल 28 तर रविचंद्र अश्विन 11 धावावर खेळत होते. ऑस्ट्रेलियाच्या लेयॉनने चहापानापर्यंत आपल्या 20 षटकात 41 धावात 5 गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये लेयॉनने 22 वेळा 5 पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. चहापानावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 263 या धावसंख्येपेक्षा 84 धावांनी पिछाडीवर होता.
खेळाच्या शेवटच्या सत्रात अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी ऑस्ट्रेलियाच्या फिरकीसमोर आत्मविश्वासाने फलंदाजी केली. या जोडीने आठव्या गड्यासाठी 114 धावांची भागीदारी केली. कर्णधार कमिन्सने भारताची ही जोडी फोडण्यात यश मिळवले. कमिन्सच्या गोलंदाजीवर अश्विन बदली खेळाडू रेनशॉकडे झेल देऊन तंबूत परतला. त्याने 71 चेंडूत 5 चौकारासह 37 धावा जमवल्या. यानंतर पटेल फार वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. मर्फीने त्याला कमिन्सकरवी झेलबाद केले. पटेलने 115 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारासह 74 धावा जमवल्या. कुहेनमनने मोहमद शमीचा त्रिफळा उडवून भारताचा डाव 83.3 षटकात 262 धावांवर रोखला. ऑस्ट्रेलियाने केवळ एका धावेची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियातर्फे लेयॉनने 5, कुहेनमनने 72 धावात 2, मर्फीने 53 धावात 2 तर कमिन्सने चार धावात 1 गडी बाद केला. दुखापतीमुळे डेविड वॉर्नर क्षेत्ररक्षण करण्यासाठी उपलब्ध होऊ न शकल्याने त्याच्या जागी रेन्शॉ बदली खेळाडू म्हणून मैदानात आला.
कोटलाची खेळपट्टी फिरकीला अधिक अनुकूल होत असल्याचे पाहून कर्णधार शर्माने पहिल्या षटकापासूनच नवा चेंडू अश्विनकडे सोपविला. उस्मान ख्वाजाला साथ देण्यासाठी ट्रेविस हेडला सलामीला पाठवण्यात आले. हेडने भारतीय गोलंदाजीसमोर आक्रमक फटकेबाजी केली. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील सहाव्या षटकात ख्वाजा जडेजाच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद झाला. त्याने 1 चौकारासह 6 धावा जमवल्या. जडेजाच्या चेंडूवर स्लिपमधून चौकाराचा फटका ख्वाजाने मारला पण श्रेयस अय्यरने झेपावत एकहाती हा झेल टिपला. ख्वाजा बाद झाल्यानंतर हेड आणि लाबुशेन यांनी अधिक सावध खेळी केली. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 12 षटकात 1 बाद 61 धावा जमवल्या. हेड 40 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 39 तर लाबुशेन 19 चेंडूत 3 चौकारासह 16 धावावर खेळत आहेत. जडेजाने 23 धावात एक गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी आहेत. दोन्ही संघ आपले वर्चस्व ठेवण्यासाठी झगडत आहेत. भारताची फिरकी तसेच ऑस्ट्रेलियाची भक्कम फलंदाजी यावरच सामन्याचा निकाल अवलंबून राहिल.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 78.4 षटकात सर्वबाद 263, भारत प. डाव 83.3 षटकात सर्वबाद 262 (रोहित शर्मा 2 चौकारासह 32, केएल राहुल 1 षटकारासह 17, पुजारा 0, कोहली 4 चौकारासह 44, अय्यर 4, रविंद्र जडेजा 4 चौकारासह 26, एस. भरत 1 चौकारासह 6, अक्षर पटेल 3 षटकार आणि 9 चौकारासह 74, रविचंद्रन अश्विन 5 चौकारासह 37, शमी 2, सिराज नाबाद 1, अवांतर 19, लेयॉन 5-67, कुहेनमन 2-72, टॉड मर्फी 2-53, कमिन्स 1-4), ऑस्ट्रेलिया दु. डाव 1 बाद 61 (उस्मान ख्वाजा 1 चौकारासह 6, हेड 1 षटकार आणि 5 चौकारासह 39 धावांवर तर लाबुशेन 19 चेंडूत 3 चौकारासह 16 धावांवर खेळत आहेत, जडेजा 1-23).









