ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Bhagwat deshmukh murder आठवडाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या अकोला उपशहर प्रमुखाची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर त्याचा मृतदेह तलावात फेकण्यात आला होता. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नव्हती. त्यामुळे पोलिसांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले होते. भागवत अजाबराव देशमुख (28, रा. कौलखेड) असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत देशमुख हा 25 ऑगस्टपासून घरातून बेपत्ता होता. त्यापूर्वी 23 ऑगस्टला त्याने अकोल्यात खासदार श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच त्याची नियुक्ती अकोला उपशहरप्रमुख म्हणून करण्यात आली होती. दरम्यान, 27 ऑगस्टला पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील कापशीच्या तलावात अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता. मात्र, वैद्यकीय तपासणीच्या अहवालात युवकाची हत्या झाल्याचे समोर आले होते.
अधिक वाचा : शिंदे सरकारमध्ये रासपला मंत्रिपद मिळावे, जानकरांची मागणी
तलावात दोन दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने युवकाची ओळख पटवणे पोलिसांसाठी कठीण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर 29 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार केले. 30 ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरात पाहणी केली असता अर्धा किलोमीटर अंतरावर रुमालमध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळल्या. अधिक तपासात हा मृतदेह भागवत देशमुखचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी अकोल्यातील पातूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.








