मंत्री हेब्बाळकर यांची माहिती : जनजागृतीसाठी सरकारचा उपक्रम
बेळगाव : बालविवाह, अल्पवयीन मुली गर्भवती यासारख्या प्रकरणांना नियंत्रण व जनजागृतीसाठी बेळगाव जिल्ह्याच्या चार तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘अक्क दल’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महिला-बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. येथील सुवर्णसौधमध्ये माध्यमांसमोर त्या बोलत होत्या. बिदरमध्ये ‘अक्क दल’ हा उपक्रम यशस्वी झाला आहे. हाच उपक्रम बेळगाव जिल्ह्याच्या चार तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येईल. याला प्रतिसाद मिळाल्यास पुढील दिवसात ‘अक्क दल’चा राज्यभर विस्तार करण्यात येईल. महिला पोलीस, एनसीसी अधिकारी, कर्मचारी यांनी समाविष्ट असलेली ‘अक्क दले’ आपल्या जिल्ह्यातील गावे, शाळा, महाविद्यालयांना भेट देऊन बालविवाह, महिलांवर होणारे अत्याचार, पोक्सो कायद्याअंतर्गत होणारी शिक्षा याबाबत जागृती करतील.
महिला, तरुणी, विद्यार्थिनींना कोणती समस्या आल्यास तत्काळ पोलीस साहाय्यवाणी 112 किंवा बाल साहाय्यवाणी 1098 वर संपर्क साधावा. मनात कोणतेही भयगंड न ठेवता स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार द्यावी, यासंबंधी ‘अक्क दल’ जागृती करणार आहे. कोणत्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे धैर्य देण्याचे कार्य ‘अक्क दल’ करणार आहे, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. राज्यात सुमारे 2500 अल्पवयीन मुली गर्भवती असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. बालविवाह, बदलती कौटुंबिक व्यवस्था, तरुणींची प्रेमप्रकरणे, समाज माध्यमांचा अतिवापर यासारख्या प्रकारांमुळे अल्पवयीन मुली गर्भवती राहण्याचे प्रमाण वाढले असल्याचे एका पाहणीतून सिद्ध झाले आहे. याला आळा घालण्यासाठी कायदे असले तरी अनेकदा ते निरुपयोगी ठरतात. त्यामुळे जनजागृती करणे हा एक उत्तम पर्याय असून ‘अक्क दल’ हे कार्य करणार आहे.
100 अंगणवाड्यांना इमारती
200 कोटी रुपये खर्चातून राज्यात 100 अंगणवाडी केंद्रांच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. यंदाही 300 कोटी खर्चातून 200 अंगणवाडी केंद्रांच्या इमारती उभारण्यात येतील. केंद्र सरकारकडून महिला-बालकल्याण खात्याला अतिरिक्त अनुदान मिळाले आहे, अशी माहिती मंत्री हेब्बाळकर यांनी दिली.









