तालिबानमध्ये मोठी फूट : कतारला जाण्यापासून शिष्टमंडळाला रोखले
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानात 14 सदस्यीय शिष्टमंडळाला कतारला जाण्यापासून रोखण्यात आले आहे. अफगाणिस्तान फ्यूचर थॉट फोरमच्या बैठकीत भाग घेण्यासाठी हे शिष्टमंडळ दोहा येथे जात होते. अखेरच्या क्षणी या शिष्टमंडळाला विमानातून खाली उतरविण्यात आले. या 14 सदस्यीय शिष्टमंडळात दोन महिलांचा समावेश होता. महिलांची उपस्थिती आणि अफगाण तालिबानमध्ये पडलेली फूट यासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने हक्कानी नेटवर्क आणि तालिबान राजवटीचा प्रमुख हेबतुल्लाह अखुंदजादा गटामधील संघर्ष उघड झाला आहे.
अफगाणिस्तान फ्यूचर थॉट फोरमच्या बैठकीत सामील होणाऱ्यासाठी कतार येथे जात असलेल्या लोकांना रोखण्याची घटना काबूल विमानतळावर घडली आहे. शिष्टमंडळातील काही सदस्य विमानात दाखल झाले होते. या सदस्यांना फ्लायदुबईच्या विमानतून खेचून उतरविण्यात आले. काही लोकांना एअर अरेबियाच्या विमानात चढण्यापूर्वी रोखण्यात आले. अफगाणिस्तानातून केवळ जफर महदवी हेच दोहा येथे पोहोचले आहेत.
तालिबान अंतर्गत संघर्ष
या शिष्टमंडळाला रोखण्यामागे दोन कारणं असल्याचे मानले जाते आहे. याती पहिले कारण शिष्टमंडळात महिलांचा समावेश आणि दुसरे कारण हक्कानी नेटवर्क तसेच हेबतुल्लाह अखुंदजादा गटामधील वाढता शक्तिसंघर्ष आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियंत्रण अलिकडेच अखुंदजादाशी निगडित तालिबानी दलांनी हाती घेतले आहे. याच दलांनी या शिष्टमंडळाला कतार येथे जाण्यापासून रोखले आहे. यामुळे दोन्ही गटांमध्ये पुढील काळात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच या घटनेमुळे अफगाणिस्तानच्या भवितव्याबद्दल चिंता वाढली आहे.
काबूल विमानतळावर रोखण्यात आलेल्या शिष्टमंडळाच्या सदस्यांमध्ये फैज मोहम्मद जालंद, अजीज अहमद हनीफ, नजर मोहम्मद मोतमईन, इंजीला अहमदी आणि मदीना महबूबी यांचा समोश आहे. शिष्टमंडळातील एक सदस्य जफर महदवी दोहा येथे पोहोचले आहेत. अफगाणिस्तान फ्यूचर थॉट फोरम 30 सदस्यांचा एक समुह असून यात माजी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सामील आहेत. हा फोरम अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर तालिबान अन् आंतरराष्ट्रीय समुदायाला शिफारसी करतो.









