वृत्तसंस्था /लखनौ
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता सपा अध्यक्ष अखिलेश यादव राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत. अखिलेश यादव 25 फेब्रुवारीला आग्रा येथील न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत. यापूर्वी अखिलेश यादव यांनी रायबरेली येथे सहभागी होण्याची घोषणा केली होती. मात्र जागावाटपाचा निर्णय न झाल्याने त्यांनी आपले नियोजन रद्द केले होते. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस 17 जागांवर तर, सपा 63 जागांवर निवडणूक लढवणार आहे. जागांच्या करारानंतर बुधवारी सायंकाळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत फॉर्म्युला जाहीर झाल्याची घोषणा केली होती.









